अलिबाग येथे बनावट नोटा छापणार्‍या त्रिकूटाला रायगड पोलिसांनी ठोकल्या बेड्या


मच्छी विक्रेते, भाजी विक्रेते यासह छोट्या व्यावसायिकांना नोटा वटवल्याचा संशय



अलिबाग येथे बनावट नोटा छापूून त्या वटवण्याच्या प्रयत्न करणार्‍या तिघांना रायगड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून शंभर, दोनशे आणि पाचशेच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या भामट्यांनी मच्छी विक्रेते, भाजी विक्रेते यासह छोट्या व्यावसायिकांना नोटा वटवल्याचा संशय पोलिसांना आहे.

29 सप्टेंबर रोजी अलिबाग बायपास रोड येथे अशोक पोकळे यांच्याकडून जयदीप आणि सुमित यांनी दोन कांद्याच्या गोणी खरेदी केल्या. त्यानंतर शंभर रुपयांच्या 22 नोटा असे दोन हजार दोनशे रुपये पोकळे यांना दिले. मात्र या नोटा खोट्या असल्याचे पोकळे यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार केली.
 यानुसार गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दयानंद गावडे यांची टीम कामाला लागली. तपासाअंती जयदीप अजित घासे (वय 26), सुमित सुनिल बागकर (वय 26) आणि कौस्तुभ चंद्रकांत गिजम (वय 24, तिघेही रा. अलिबाग) या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. अन्य एकाचा पोलीस शोध घेत आहेत.
 
पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेले लॅपटॉप, प्रिंटर, शाई, कोरे कागद ताब्यात घेतले आहे. तसेच 500 रुपयांच्या 63 नोटा, 200 रुपयांच्या 82 नोटा आणि शंभर रुपयांच्या 22 बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. ज्याची चलनातील किंमत 49 हजार 900 रुपये होते.
 अटक केलेल्या तिघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मंगळवारपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख दयानंद गावडे यांनी दिली. 
 दरम्यान, आधीही या त्रिकूटाने मच्छी विक्रेते, काही दुकाने अशा विविध ठिकाणी बनवाट नोटा वटवल्या असल्याची शक्यता गावडे यांनी व्यक्त केली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा