फोटो : म्हसळा तालुक्यातील आयोजित कार्यक्रमात राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी व्यंकट तरवडे यांचे कौतुक करून शुभेच्छा देताना
● निरोप समारंभ कार्यक्रमात मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा....
● पालकमंत्री आदिती तटकरे यांनीही व्यंकट तरवडे यांचे कामाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यातील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी श्री.व्यंकट तरवडे यांची भिवंडी येथे पदोन्नती ने बदली झाली आहे. श्री.तरवडे म्हसळा पंचायत समिती मधे सन ऑगस्ट 2018 साली रुजू झाले होते. तेव्हापासून त्यांनी सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन उत्तमरीत्या सेवा बजावली आहे. कार्यालयात आयोजित निरोपसमारंभ कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी तरवडे यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना पुढील पदोन्नती बाबत शुभेच्छा दिल्या.
तसेच राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनीही त्यांच्या दौऱ्यातील म्हसळा तालुक्यात आयोजित कार्यक्रमात एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी व्यंकट तरवडे यांचे कामाचे कौतुक करून पुढील पदोन्नतीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
निरोपसमारंभ कार्यक्रमवेळी श्री.व्यंकट तरवडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की मी आज जे काही सेवा बजावली आहे आणि जे काम केले आहे त्याचे कौतुक होत असले तरी यामागे माझे सर्व अधिकारी, सुपरवायझर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, कार्यालयातील कर्मचारी वर्ग, अशा माझ्या सर्व सहकाऱ्यांचे परिश्रम व सहकार्य आहे त्यामुळेच माझ्या हातून चांगले काम घडले आहे तसेच तालुक्याचे तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशा सर्व अधिकारी वर्गाचे सहकार्य देखील महत्त्वाचे होते. मी ज्या ज्या वेळेस अंगणवाडी व्हीझीट साठी जायचो तेव्हा तेथील अंगणवाडीत जे पूरक पोषण आहार अन्न शिजवलेले असते ते मी स्वतः चाखून बघत असतो. सॅम-मॅम गटातील सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या योजना पोहचविल्या आहेत. माझी म्हसळा तालुक्यातून जरी पदोन्नती ने बदली झाली असली तरी अंगणवाडी सेविका किंवा माझ्या कोणत्याही सहकाऱ्याने मला मदतीसाठी कधीही हाक मारा मी नेहमीच सहकार्यासाठी तयार असेल असे सांगून म्हसळा तालुक्यात सेवा बजावली असल्याचे आपणास मनापासून समाधान आहे असेही व्यंकट तरवडे यांनी सांगितले.
श्री.व्यंकट तरवडे यांनी जिल्हा महिला बालविकास अधिकारी अतिरिक्त कार्यभार असून सुद्धा रायगड जिल्ह्यातील कोरोना कालावधीत 2 पालक मृत्यू पावलेल्या 20 मुलांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचे फिक्स डिपॉझिट (एफडी), एक पालक गमावलेल्या 600 मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठीचे प्रस्ताव मंजूर झालेले आहेत. बालसंगोपन योजनेत प्रत्येक मुलाला दरमहा अकराशे रुपये मुलांचे वयाचे 18 व्या वर्षापर्यंत त्यांना मिळतील व त्यांचा शैक्षणिक संपूर्ण खर्च शासनाकडून परस्पर रक्कम शाळेत वर्ग करण्यात येईल.
बालविकास प्रकल्प अधिकारी म्हसळा कार्यभार सांभाळत असताना अतिरिक्त बालविकास प्रकल्प अधिकारी मुरुड तालुका आणि जिल्हा महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी अशा तीन पदांवर चांगल्या पद्धतीने काम करून बेटी बचाव, बेटी पढाव, कुपोषण निर्मूलन, पोषण महा, आकार प्रशिक्षण, इत्यादी सर्व कामे म्हसळा तालुक्यात उत्तमरीत्या सेवा बजावली आहे.
श्री.व्यंकट तरवडे यांना जिल्हा परिषद कडून 2005 मध्ये गुणवंत अधिकारी म्हणून पुरस्कार मिळाला आहे तसेच सर्व शाळांना व अंगणवाड्यांना 100% पाणीपुरवठा केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड, अलिबाग यांचेकडून प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
रायगड जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बबन मनवे यांनीही मनोगत व्यक्त करताना सांगितले की तरवडे यांनी तालुक्यात काम करीत असताना कर्मचारी वर्गाला एक चांगला आदर्श घालून दिला आहे. अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने चांगले काम करीत असताना त्यांचे म्हसळा तालुक्यातून जाण्याने अधिकारी वर्गात एक पोकळी निर्माण होणार आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी व्यंकट तरवडे यांच्या कामाचे कौतुक करून पुढील पदोन्नतीसाठी शुभेच्छा दिल्या. तर गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे यांनी व्यंकट तरवडे यांचे कामाचे कौतुक करताना सांगितले की तरवडे यांनी घालून दिलेले आदर्श अंगणवाडी सेविकांनी आपल्या कामातून जपले पाहिजे.
यावेळी कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बबन मनवे, पंचायत समिती सभापती छायाताई म्हात्रे, उपसभापती संदिप चाचले, माजी उपसभापती मधुकर गायकर, गटविकास अधिकारी वाय.एम प्रभे, विस्तार अधिकारी राजेश कदम, ग्राप.पाभरे सरपंच अनिल बसवत, ग्राप कणघर माजी सरपंच संतोष (नाना) सावंत, यांसह विस्तार अधिकारी प्रमोद गायकवाड, पर्यवेक्षिका वैष्णवी कलबासकर, पर्यवेक्षिका रेणुका पाटील, पर्यवेक्षिका दिपाली पालवे, कनिष्ठ सहाय्यक अरविंद बैनवाड, गटसमन्वयक कल्पेश पालांडे, अंगणवाडी सेविका, मदतनीस, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
फोटो निरोपसमारंभ कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी व्यंकट तरवडे
Post a Comment