तळा शहराची ग्रामदेवता चंडिका माता नवरात्रोत्सवास आजपासून प्रारंभ




तळा श्रीकांत नांदगावकर

तळा शहराची ग्रामदेवता श्री चंडिका माता नवरात्रोत्सवास आजपासून प्रारंभ होणार आहे.देवी मंदिरात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जातो. देवीच्या नवरात्रोत्सवात घटस्थापना, अखंड दीप, घटावर दीड माळा, आणि कुमारिका पूजन हे महत्वाचे भाग असतात.देवी घटी बसविण्यासाठी विविध वतनदारांना कामे वाटून दिलेली असतात.त्यामध्ये कुंभार घट व माती आणतो.बुरुड परडी आणतो.वाणी घटाजवळ पेरा करण्यासाठी विविध प्रकारची धान्ये तसेच नऊ दिवस अखंड दीप लावण्यासाठी तेल आणतो.नाभिक आरसा आणतो. शिंपी खण आणतात.पोतदारांकडून रोज देवीला तिळाच्या फुलांची माळ बांधली जाते.यामध्ये पुर्ण माळ ही सवाशीणीची अन अर्धी माळ कुमारिकेची असते.प्रतिपदेला दुपारी बारा वाजता चंडिका देवी वतनदार उपाध्ये यांच्याकडून घटी बसविली जाते. शेतातील काळी माती आणून वेदिका तयार करतात.वाण्यांनी आणलेली ७ प्रकारची धान्ये पेरली जातात.नवरात्रात दरदिवशी देवीला नवीन साडी, चोळीचे सुशोभन केल्यावर मुखवटा, कंबरपट्टा, आशा विविध दागिन्यांनी सजविले जाते.देवीच्या दागिन्यांच्या देखभालीसाठी गुरव २४ तास मंदिरात हजर असतो.मांग वतनदार देवीची कवने गातो. सकाळी व संध्याकाळी देवीची आरती करण्यात येते. संध्याकाळच्या आरतीनंतर परिटवाड्यातील सुतार मंडळी पंचपदी म्हणतात.नवरात्रोत्सवात मंदिरात भजन व जागरण करण्यासाठी प्रत्येक वाडीस पुढील प्रमाणे तिथी नेमून दिलेली आहे.घटस्थापनेच्या दिवशी जोगवाडीकर,द्वितीयेला राणेचीवाडी गोळेआळी, तृतीयेला फोंडळआळी, चतुर्थीला मुंढ्याची वाडी, पंचमीला भोईरवाडी ,षष्ठीला कुंभारवाडा व राणेचीवाडी(मंडलिक आळी)सप्तमीला आनंद वाडी, अष्टमीला वडाची वाडी,व शेवटी दसऱ्याच्या दिवशी पुसाटी वाडी अशा प्रकारे नऊ दिवस देवीचा कार्यक्रम पार पाडला जातो.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा