गणेशभक्तांच्या स्वागतासाठी माणगाव आगार सज्ज ; चाकरमान्यांसाठी मुंबई फेर्‍या वाढविल्या...

 

उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प

टीम म्हसळा लाईव्ह  

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून चाकरमान्यांना गावची ओढ लागली आहे. गणपतीसाठी गावाकडे येणार्‍या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी माणगाव आगार सज्ज झाला आहे. चाकरमान्यांसाठी मुंबई फेर्‍या वाढविण्यात आल्या असून, गरज लागल्यास आणखी फेर्‍या वाढविण्याची तयारीही करण्यात आली आहे. कोकणातील चाकरमानी नोकरीनिमित्त मुंबई, ठाणे, पुणे तसेच सूरत या भागात आहे. मात्र दरवर्षी न चुकता ते गणपतीसाठी गावाकडे येत असतात. गतवर्षी कोरोनामुळे चाकरमानी शहरांमध्ये अडकून पडले होते. यंदा मात्र आधीच तयारी करण्यात आली आहे.

या चाकरमान्यांच्या प्रवासात कोणतेही विघ्न येऊ नये, त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, म्हणून एसटी महामंडळाच्या माणगाव बस आगाराने विशेष काळजी घेतली आहे. चाकरमान्यांच्या सेवेसाठी माणगाव आगार सज्ज झाले आहे. माणगाव आगाराने मुंबईसह ग्रामीण भागातील चाकरमानी प्रवाशांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. आगारात ३६ एसटी गाड्या आहेत. त्यापैकी १० एसटी ह्या वरिष्ठांकडून आलेल्या सूचनेप्रमाणे मुंबईसाठी मागविल्या आहेत. त्यामुळे माणगाव बस आगाराकडे २६ बस गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध राहणार आहेत.

माणगाव व आजुबाजूच्या तालुक्यांतील चाकरमानी गौरी-गणपती सणासाठी कुटुंबासह येत असतो. या बस आगारातून सुटणार्‍या बस या अपुर्‍या असल्या तरी माणगाव आगाराने यंदा उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उपलब्ध बस गाड्यांनुसार दमदार पाऊल उचलले आहे. माणगाव आगाराकडे असणार्‍या उपलब्ध गाड्यापैकी गोरेगाव-माजलगाव, माणगाव-अंबेजोगाई या दोन गाड्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी चालू आहेत. तर शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या एसटी फेर्‍या शाळा बंद असल्याने, त्या एसटी गाड्या गणेशोत्सवासाठी मुंबईतून येणार्‍या चाकरमान्यासाठी वापरण्यात येणार आहेत. मुंबईतून येणार्‍या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, त्यांच्या सेवेसाठी ही बस सेवा तत्पर असेल. चाकरमान्यांची गर्दी व गरज लक्षात घेता माणगाव आगाराने या फेर्‍या वाढविल्या आहेत.

 ग्रामीण भागातील गणेशभक्त प्रवासी शहराकडे खरेदीसाठी तसेच नातेवाईकांकडे ये-जा करण्यासाठी प्रवास मोठ्या प्रमाणात करतात. त्याचीही गरज लक्षात घेता बस फेर्‍या वाढविण्याचे नियोजन केले आहे. १० सप्टेंबरला गणरायाचे आगमन असून, केवळ नऊ दिवस राहिले आहेत. त्यामुळे चाकरमानी आपापल्या गावी येण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी माणगाव एसटी आगाराने ५ ते १० सप्टेंबर या कालावधीत मुंबईकडून येणार्‍या व मुंबईकडे जाणार्‍या प्रवाशांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

तर १५ ते २० सप्टेंबर दरम्यानच्या कालावधीत परतीच्या प्रवासासाठी बस फेर्‍यांमध्ये वाढ करुन सेवा पुरवली जाणार आहे. त्यामुळे यंदाचे वरिष्ठ कार्यालयाकडून दिले गेलेले उत्पन्नाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आगारातील अधिकारी कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. गतवर्षी गणेशोत्सवात माणगाव आगाराच्या बस मधून ७ हजार ४८० प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून १६ लाख १८ हजार १२३ रुपये उत्पन्न मिळाले. यंदाच्या वर्षी या उत्पन्नात अधिक वाढ करुन उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा