माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना पाहून तळीये दरडग्रस्त झाले भावूक



पूरग्रस्त महाडकरांचीही घेतली भेट; सर्वतोपरी मदतीचा शब्द


टीम म्हसळा लाईव्ह 

 शिवसेना नेते, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते (Anant Geete) यांनी रविवारी (25 जुलै) दरडग्रस्त तळीये गावाला भेट दिली. येथील दरडग्रस्तांना धीर देत, सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. यानंतर पूरग्रस्त महाड शहरात चिखलातून पायी चालतच नागरिकांशी संवाद साधला.

दरडग्रस्त तळीये गाव हे शहरापासून खूप दूर, महाड तालुक्याच्या दुर्गम भागात अगदी टोकावर आहे. त्यामुळे या गावात दरड कोसळल्यानंतर कोणालाही या गावाकडे जाणारा पक्का रस्ता आहे की नाही? याठिकाणी कसे पोहोचायचे? असा प्रश्न पडला होता.

मात्र याच तळीये गावाला मुंबई-गोवा महामार्गाशी जोडणारा पक्का रस्ता ना. गीते हे रायगडचे खासदार असताना नाबार्डच्या माध्यमातून बांधण्यात आला होता. त्यामुळे तळीये गावाशी ना.अनंत गीते यांचे जुने नाते आहे. त्यामुळे आज त्यांना तळीये गावात पाहिल्यानंतर येथील ग्रामस्थ भावूक झाले होते.

येथील दरडग्रस्तांशी संवाद साधत, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी त्यांना धीर दिला. झालेले नुकसान भरुन तर निघणार नाही, पण यातून सावरण्यासाठी लागणारे बळ निश्चितपणाने दिले जाईल, असा शब्द त्यांनी ग्रामस्थांना दिला. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, असे तळीये ग्रामस्थांना सांगितले.

तळीये गावाला भेट दिल्यानंतर त्यांनी पूरग्रस्त महाड शहरातील बाजारपेठेची पाहणी केली. येथील चिखलाने भरलेल्या रस्त्यातून चालतच वाट काढत त्यांनी पूरग्रस्त महाडकरांची भेट घेतली. त्यांना धीर दिला. या संकटातून सावरण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे अश्वस्त केले. त्यानंतर त्यांनी महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांची भेट घेतली.

यावेळी ना.गीते यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे, पेण तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे, प्रशांत मिसाळ, राजेंद्र राऊत, राजेश काफरे, निलेश वारंगे आणि शिवसैनिक होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा