रोटरी क्लब न्यु पनवेलच्या कार्याचे रो. शेखर मेहेतांकडुन विशेष कौतुक
पनवेल (वार्ताहर)
रोटरी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी एक सेवाभावी संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून समाजातील व्यवसायिक व अन्य लोकांना एकत्र आणून त्यांच्या माध्यमातून मानवतेचा व सामाजिक बांधिलकीचा द्रुष्टीकोन मनामध्ये ठेवून जगभरात शांतता प्रस्थापित करण्याचे व समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा पुरवण्याचे काम सुरू आहे.
रोटरी ही अराजकीय व सर्वधर्मीय नागरिकांची संघटना असून ही संस्था सगळ्यांसाठी खुली आहे.
रोटरी क्लब न्यू पनवेल तर्फे नुकतेच रोटरी इंटेरनेशनलचे प्रेसिडेंट शेखर मेहेता यांच्या शुभहस्ते व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत 10,000 स्क्वे. फुटच्या मेगा मेडिकल सेंटरचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.
रो. शेखर मेहेता हे रोटरी इंटरनेशनलचे विद्यमान प्रेसिडेंट असून आंतरराष्ट्रीय स्तरावर रोटरीचे नेतृत्व करण्याची संधी मिळालेले चौथे भारतीय आहेत.
त्यांच्या प्रमुख उपस्थितीत या मेगा मेडिकल सेंटरचे उद्घाटन होणे हा दुग्धशर्करा योग जुळून आला.
खांदा कॉलनी येथे निवडक मान्यवर,रोटरी सदस्य व दानशूर लोकांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
रो. शेखर मेहेता यांनी यावेळी या लोकोपयोगी प्रकल्पासाठी रोटरी क्लब न्यू पनवेलची तोंड भरून स्तुती केली तसेच या प्रकल्पासाठी आर्थिक योगदान देणाऱ्या सर्व दानशूर मंडळींचे आभार व्यक्त केले.
आपल्या मनोगतामध्ये त्यांनी पनवेल गणेश मंदिर ट्रस्टच्या भरीव योगदानाचाही आवर्जून उल्लेख केला.
रोटरी क्लब न्यू पनवेलच्या 2026 साली प्रस्तावित असलेल्या 100 बेडच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि कर्करोग सेंटरसाठी देखील त्यांनी यावेळी शुभेच्छा व्यक्त केल्या.
हा भव्यदिव्य प्रकल्प साकार करणाऱ्या रोटरी क्लब न्यू पनवेलची स्थापना सन 1987 मध्ये झालेली असून तेव्हापासून या क्लबच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यात आले आहेत.
सन 1997 साली सिडकोच्या सहकार्यातून रोटरी क्लब न्यु पनवेल तर्फे अद्ययावत रक्तपेढि सुरू करण्यात आली गेली 24 वर्ष या रक्तपेढिच्या माध्यमातून अनेक गरजूंकरिता रक्ताचा पुरवठा केला जातो.
सन 2013 मध्ये क्लबचे सदस्य तसेच सन 2022-2023 या वर्षाचे रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे नियोजित प्रांतपाल डॉ. अनिल परमार यांच्या संकल्पनेतून या रोटरी मेगा मेडिकल सेंटरची मुहुर्तमेढ रोवण्यात आली पूढे जाऊन या मेगा मेडिकल सेंटरचे नामकरण कै. चंद्रकुवर कोठारी मेगा मेडिकल असे करण्यात आले.
हे मेडिकल सेंटर सर्व अत्याधुनिक सेवा सुविधांनी सुसज्ज असून या सेंटर मध्ये रक्तपेढी,डायलिसीस सेंटर,कम्युनिटी सेंटर हॉल आदी सुविधा देखील उपलब्ध आहेत.
या मेगा मेडिकल सेंटर साठी अंदाजे सहा करोड इतका खर्च आलेला असुन रोटरी क्लब न्यु पनवेलचे तीन दानशूर सदस्य,रोटरी इंटरनेशनल,रोटरी डिस्ट्रिक्ट 3131,तसेच अनेक स्थानिक दाते यांच्या आर्थिक योगदानातून हा प्रकल्प साकार झाला आहे.
ह्या मेडिकल मेगा सेंटर साठी निवडण्यात आलेली जागा देखील अत्यंत मध्यवर्ती असून या जागेपासून मुंबई पूणे राष्ट्रीय महामार्ग NH4 एका किलोमीटरवर आहे तसेच नवी मुंबई येथे प्रस्तावित असलेले विमानतळ देखील येथून अगदी जवळ आहे.
या मेडिकल मेगा सेंटरचा येथील स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार असून रोटरी क्लब न्यु पनवेलचे सर्व सदस्य या मोठ्या प्रोजेक्टचा आपणही एक भाग असल्याबद्दल स्वतःला अत्यंत नशीबवान समजत आहेत.
या रोटरी मेगा मेडिकल सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी रोटरी इंटरनेशनल प्रेसिडेंट शेखर मेहेता यांच्या समवेत रोटरी इंटरनेशनलचे डायरेक्टर महेश कोटीबागी,डॉ. अनिता,जिल्हा प्रांतपाल पंकज शहा,पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर,माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे,ट्रस्ट चेअरमन पुरुषोत्तम अग्रवाल,ट्रस्ट सेक्रेटरी विलास कोठारी,क्लब प्रेसिडेंट डॉ. मिना बिसवाल आदींसह दानशूर व्यक्ती उपस्थित होत्या.
Post a Comment