दिघी-बोर्ली-श्रीवर्धन मार्ग पाण्याखाली; वाहतूक बंद दिघी पोर्टकडे जाणार्‍या रस्त्यावर दरड कोसळली



बोर्लीपंचतन परिसरात पावसाने उडवली दाणादाण

  • दिघी-बोर्ली-श्रीवर्धन मार्ग पाण्याखाली; वाहतूक बंद
  • दिघी पोर्टकडे जाणार्‍या रस्त्यावर दरड कोसळली; रस्ताही खचला
  • बोर्ली गुडलक मोहल्ला जलमय, घरात घुसले पाणी
  • नाल्यामध्ये माती, नवीन बांधकाम व अनधिकृत भरावामुळे पाणी तुंबले


अभय पाटील : बोर्लीपंचतन 

श्रीवर्धन तालुक्यामध्ये गेले तीन दिवस धुवाँधार पाऊस बरसत आहे. मागील 20 दिवस पावसाने दडी मारल्याने शेतीची कामे खोळंबून राहिली होती; परंतु पावसाच्या पुन्हा जोरदार आगमनाने शेतकरीवर्ग सुखावला असून सर्वत्र भात लावणीच्या कामाला वेग आला आहे. तर सतत कोसळणार्‍या पावसाने बोर्लीपंचतन गुडलक मोहल्ला, कार्ले नदी, शिस्ते, कापोली, दिवेआगर भाग जलमय झाला आहे.
 
गुडलक मोहल्ला परिसरात खलिफे चाळीमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली तर दिघी-बोर्ली-श्रीवर्धन मार्ग आज (12 जुलै) पहाटेपासून पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद केली होती. बोर्लीपंचतन, शिस्तेमधील नाले पावसाच्या पाण्याने आलेल्या मातीच्या गाळाने बंद झाले. तसेच काही ठिकाणी झालेले अनधिकृत माती भराव व घर बांधकाम यामुळे पाणी जाण्यास मार्ग नसल्याने पाणी रस्त्यावर व घरामध्ये घुसले. याचा फटका नागरिकांना बसला. तर कार्ले नदी वडवली नदीचे पाणीदेखील रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती.

दिघी पोर्टकडे जाणार्‍या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने अपूर्णावस्थेत असलेल्या रस्त्यावर दरड कोसळली असून काही भागात रस्ता खचला आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणार्‍या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
बोर्लीपंचतन (Borlipanchtan Rain) परिसरामध्ये शनिवारपासून मान्सून पुन्हा जोरदार सक्रिय झाला. मागील 20 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने व कडक ऊन पडल्यामुळे शेतीची कामे खोळंबून राहिली होती. भात रोपे पूर्ण सुकून जाण्याच्या मार्गावर होती; किंबहुना दुबार पेरणी करावी लागते की काय? अशा चिंतेत शेतकरी वर्ग होता. पण पावसाने सुरुवात केल्याने शेतकरीवर्गात समाधानाचे वतावरण आहे.

 
रविवारी (11 जुलै) सकाळपासूनच पावसाने दमदार बरसण्यास सुरुवात केली. संततधार पडणार्‍या पावसाने बोर्लीपंचतनसह दिवेआगर, शिस्ते, कापोली गाव जलमय झाले होते. सतत दोन दिवस बरसणारा पावसाने नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडविली आहे. बोर्लीपंचतन येथील श्रीवर्धन मार्गावर दिवेआगर फाटा जवळील नाला गेली अनेक वर्षे पावसाच्या येणार्‍या मातीमुळे सतत बंद होत आहे. त्यातच नवीन झालेली बांधकाम व त्यातून नैसर्गिक पाणी जाण्याचा मार्ग बंद झाल्याने गुडलक मोहल्ला भाग पूर्ण जलमय झाला आहे. तर खलिफे चाळीतील सर्व खोल्यामध्ये पाणी घुसल्याने तेथील रहिवासी यांची मोठी तारांबळ उडाली.

 
वडवली भागात असणार्‍या नदीचे पाणीदेखील दरवर्षी रस्त्यावर येत आहे. या भागातदेखील केलेल्या मातीच्या भरावामुळे नदीचे पाणी इतरत्र घुसत आहे. त्यात रस्त्याची उंची कमी असल्याने हा मार्ग दिघी सागरी पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे तर कार्ले नदीमध्ये साचलेला गाळ यामुळे नदीचे पाणी रस्त्यावर येत असून श्रीवर्धन-दिघी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर पावसाची संततधार सुरूच असून कार्ले व कुडकी लघु पाटबंधारे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तर कोंढे धरण पूर्ण भरून ओसंडून वाहू लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा