"विश्वभान"चा भव्यदिव्य फेसबुक बालमेळावा संपन्न




मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) 
फेसबुकच्या माध्यमातून "विश्वभान प्रतिष्ठान, मुंबई" तर्फे भव्यदिव्य बालमेळाव्याचा अर्थात 'मामाच्या गावाला जाऊया!' ह्या उपक्रमाचा मुलांनी मनमुराद आनंद लुटला. मे महिना म्हंटलं की सगळ्यांना वेध लागतात मामाच्या गावाला जाण्याचे. तिकडे जाऊन खूप धम्मालमस्ती मज्जा करायचे. पण सध्याचे वातावरण आणि परिस्थिती पाहता हे सर्व शक्य नाही म्हणूनच मुलांना या काळात आनंद देण्यासाठी, कोणताही मानसिक ताण न देता, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी, विश्वभान प्रतिष्ठान, मुंबई यांनी  "रम्य ते बाल' विश्व" अंतर्गत 'मामाच्या गावाला जाऊया' हा फेसबुक लाईव्ह कार्यक्रम आयोजित केला होता. १ मे ते ३१ मे २०२१ म्हणजे संपूर्ण मे महिना चाललेल्या ह्या रंगतदार सोहळ्याची सांगता ज्येष्ठ बाल साहित्यिका ज्योती कपिले यांनी फेसबुक लाईव्ह माध्यमातून केली. कार्यक्रमाविषयी गौरवोद्गार काढताना ज्योती कपिले म्हणाल्या, "फेसबुकवर भव्यदिव्य बालमेळाव्याचा अर्थात 'मामाच्या गावाला जाऊया!' याचा मुलांनी मनमुराद आनंद लुटला." त्या पुढे म्हणाल्या, "हा  उपक्रम इतका जबरदस्त होता की घराघरात आनंदाच्या बीया पेरणारा ठरला." ज्योती कपिले यांनी सादर केलेल्या बाल कवितांना आणि गोष्टींना फेसबुक लाईव्हवर उपस्थित असलेल्या बालक पालक आणि सर्व साहित्यप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला. 
"सई कुलकर्णी यांच्या सुपीक डोक्यातून सदर बालमेळावा आयोजित करण्यात यावा अशी कल्पना मांडण्यात आली होती आणि विश्वभान चमूने त्याला मूर्त रूप दिले. बालकांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करून सोहळा दिमाखदार केला" असे मत विश्वभान प्रतिष्ठान, मुंबईचे अध्यक्ष जगदीश संसारे यांनी व्यक्त केले. सांगता सोहळ्यात आभार प्रदर्शन करताना संस्थेच्या उपाध्यक्षा विंदा वीरकर म्हणाल्या, "बालक-पालक आणि सन्माननीय वक्ते यांच्या उस्फूर्त सहभागामुळे सदर मेळावा कमालीचा यशस्वी झाला. यात ६०० पेक्षा अधिक बालकांनी आपली वैविध्यपूर्ण कला सादर केली. महाराष्ट्रच नव्हे तर झारखंड, बडोदा, गोवा, बेळगाव येथून देखील बाल कलाकार मेळाव्यात सहभागी झाले होते. दहा हजार पेक्षा अधिक रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. महिनाभर चाललेल्या उपक्रमात सहा शाळा आणि चार संस्था देखील आवर्जून सहभागी झाल्या होत्या. 
सहभागी मुलांनी एकपात्री प्रयोग, नृत्य, गीत गायन, अभिनय, गप्पा, अनुभवकथन, कथाकथन, पपेट शो असे विविध कलागुण सादर केले. 
                          

फेसबुक लाईव्ह आणि चित्रफितीच्या माध्यमातून झालेल्या उपक्रमाचे आॉनलाईन पद्दतीने बालसाहित्यिक प्रकाश केसरकर यांनी १ मे २०२१ ला केले. उद्घाटन प्रसंगी बोलताना लेखक केसरकर म्हणाले, "विश्वभान प्रतिष्ठान, मुंबई यांनी राबवलेला उपक्रम लहान मुलांसाठी अतिशय उत्तम उपक्रम आहेच, परंतु घरात बसून कंटाळा आलेल्या बालक आणि पालक दोघांसाठीही मनोरंजनाचा रामबाण उपाय आहे." ते पुढे म्हणाले की, "पालकांनी अधिकाधिक बालसाहित्य वाचले तर मुलांना समजून घेणे सोपे ठरेल आणि मुलांना देखील वाचनाची गोडी लागेल." केसरकरांनी सादर केलेल्या बाल कवितांना उपस्थित बालक-पालक तसेच रसिकांनी ऑनलाईन प्रतिक्रिया देऊन उस्फूर्त दाद दिली. उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक संस्थेच्या सचिव अश्विनी टिळक यांनी केले. 
कार्यक्रमाच्या आयोजनात विश्वभान प्रतिष्ठानच्या सर्वच शिलेदारांनी हिरीरीने सहभाग नोंदवला.



Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा