शिवरुद्र कराटे अकॅडमी जाकमाता क्रीडा मंडळ आणि सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने
श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
महाराष्ट्राच्या भूमीत संस्कार, सदाचार, शौर्य, पराक्रम, विद्वत्ता नितीमत्ता याचे रोपण संत महात्म्यांनी केले आहे. अध्यात्म सोबत शौर्याचा वारसा महाराष्ट्र भूमीला लाभला आहे. मराठी तरुणांच्या ऊर्जेचा स्त्रोत म्हणजे राजा शिवछत्रपती होय. छत्रपतींचे जीवन चरित्र प्रत्येक भारतीयासाठी, तरुणांसाठी ऊर्जेचा स्रोत आहे. असे प्रतिपादन अमित शेडगे प्रांत अधिकारी श्रीवर्धन यांनी केले आहे. शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधत सामाजिक वनीकरण, शिवरुद्र कराटे अकॅडमी व जाकमाता क्रीडा मंडळाच्या वतीने श्रीवर्धन शहरातील विविध ठिकाणी अमित शेडगे यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमासाठी तहसीलदार सचिन गोसावी, सामाजिक वनीकरणाचे वनक्षेत्रपाल कुलदीप पाटकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी किरणकुमार मोरे व पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी शिवरुद्र कराटे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना संबोधित करत असताना प्रांताधिकारी अमित शेडगे म्हणाले आजचा दिवस मराठी माणसासाठी निश्चितच अभिमानाचा आहे. अंधारात स्वाभिमान हरवलेल्या मराठी माणसांमध्ये आशेचा नवीन किरण आजच्या दिवशी निर्माण झाला. स्वाभिमानाने आयुष्य जगण्यासाठी सर्वसामान्य व्यक्तीला छत्रपती रुपाने आधार मिळाला. आज रयतेचा राजा सिंहासनावर विराजमान झाला. सर्वसामान्यांचे,कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्याचे, अठरापगड जातीचे, मराठी मातीचे राज्य निर्माण झाले. अनेक शतकांचे गुलामगिरी आजच्या दिवशी उन्मळून टाकण्यात आली. आजचा दिवस मराठी मातीत जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी अभिमानाचा दिवस आहे असे अमित शेडगे यांनी सांगितले. शिवरायांच्या चरित्रातून आपणास नाविन्याचा शोध घेण्याची प्रेरणा मिळते. निसर्ग चक्रीवादळा मध्ये श्रीवर्धन तालुक्यात अगणित नैसर्गिक संपत्तीचे नुकसान झाले आहे. जाकमाता क्रीडा मंडळ, शिवरुद्र कराटे अकॅडमी व सामाजिक वनीकरण यांनी राबवलेल्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम स्तुत्य आहे. सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून कुलदीप पाटकर यांनी वड,आंबा, चिंच, काजू, अशा विविध वृक्षांची रोपे उपलब्ध करून दिले. वृक्षरोपण कार्यक्रमासाठी श्रीवर्धन मधील तरुणाईला कुलदीप पाटकर यांनी केलेले आवाहन अभिमानास्पद आहे. आगामी काळामध्ये समाजाच्या हितासाठी आपणास विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करणे अगत्याचे आहे. कोकणामध्ये मोठ्या स्वरूपात वनसंपदा आहे मात्र वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी आगामी काळामध्ये जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करणे गरजेचे आहे. समुद्रकिनारी सुरू तसेच समुद्री वाऱ्याला प्रतिबंध करतील अशा स्वरूपाच्या विविध झाडांची संख्या समुद्रकिनारे वाढवणे गरजेचे आहे. असे अमित शेडगे यांनी सांगितले. निसर्ग चक्रीवादळाने केलेली वृक्षलतांची हानी तरुणाईने घेतलेल्या पुढाकारामुळे निश्चितच लवकर भरून निघेल अशी मी आशा व्यक्त करतो. समाजोपयोगी कोणत्याही स्वरूपाचे उपक्रम राबवायचे असतील तर सदरच्या उपक्रमासाठी श्रीवर्धन प्रशासकीय यंत्रणेकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असा मी शब्द देतो असे अमित शेडगे यांनी सांगितले. जाकमाता क्रीडा मंडळाच्या वतीने जीवना बंदर येथील डोंगरावर व शिवरुद्र कराटे अकॅडमी च्या वतीने तहसील कार्यालयाच्या पाठी असलेल्या डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले. जाकमाता क्रीडा मंडळाचे कल्पेश पवार, अक्षय पवार, बंटी नलावडे विलास नलावडे आणि शिवरुद्र कराटे अकॅडमीचे साहिल यादव, प्राची गुरव, मंजिरी वैद्य, मंथन श्रीवर्धनकर आदी वृक्षारोपण प्रसंगी उपस्थित होते.
सामाजिक वनीकरण विभागाने विविध रोपे उपलब्ध करून दिली.त्यामुळे जाकमाता क्रीडा मंडळाच्या सर्व सभासदांनी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला. सर्व प्रशासकीय यंत्रणेने सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद... विजय साखरे( जाकमाता क्रीडा मंडळ )
आजचा दिवस सर्व विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय आहे. कारण शिवराज्याभिषेक दिनाच्या औचित्य साधत सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने वृक्षरोपण कार्यक्रमात सहभाग नोंदवला.. शैलेंद्र ठाकूर ( शिवरुद्र कराटे अकॅडमी )
श्रीवर्धन मधील तरुणांनी वृक्षारोपणासाठी विविध रोपांची मागणी केली त्यानुसार दोन्ही वर्गाला रोप उपलब्ध करून देण्यात आले. शिवराज्याभिषेक दिनाचा औचित्य साधत तरुणाई न केलेलं कार्य अभिमानास्पद व कौतुकास्पद आहे.... कुलदीप पाटकर ( सामाजिक वनीकरण )
Post a Comment