श्रीवर्धन प्रतिनिधी :- तेजस ठाकूर
कुत्र्याच्या खालोखाल मांजर हा लोकप्रिय प्राणी असून फार पुरातन काळापासून केवळ मनोरंजनासाठी मानव तो पाळीत आला आहे. सिंह, वाघ, चित्ता हे मांजराच्या कुळातील वन्य प्राणी आहेत व त्यांच्या प्रमाणे मांजर जात्या मांसाहारी आहे. आपल्या देशात मांजराच्या अनेक जाती व प्रजाती आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रानमांजर, खवल्या मांजर, कांडेचोर (काळमांजर) व पर्शियन मांजर आढळून येतात. याच धर्तीवर श्रीवर्धन शहरात आज कांडेचोर (काळमांजर) याला जीवनदान देण्यात आले.
आज पहाटे ५ वाजता रवींद्र चाळके यांच्या वाडीमध्ये निसर्ग चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या माडाच्या अर्धवट तुटलेल्या खोडामध्ये काळ मांजराचे तोंड आत शिरल्याने अडकले होते. बाहेर येण्याच्या प्रयत्नांमध्ये अजूनच अडचण निर्माण झाल्याने पूर्णतः अडकले गेले. त्याच्या आवाजाने आजूबाजूच्या झाडांवर कावळे जमले व अडकलेल्या कांडेचोराला चोच मारून जखमी करायला लागले. हतबल झालेल्या त्या प्राण्याने मरण पावल्या सारखे निपचित पडून राहिले. समोरील घरातील गणेश व कुणाल कुंभार या बंधूंच्या लक्षात येता त्यांनी ही गोष्ट रवींद्र चाळके व राजेंद्र भोसले यांना कळवली. राजेंद्र भोसले यांनी त्वरित सर्पमित्र गणेश कुडगावकर यांना संपर्क केला. गणेश कुडगावकर घटनास्थळी पोचताच त्यांनी शिताफीने कांडेचोराची सुटका केली व त्याचे प्राण वाचताच कांडेचोराने आनंदाने उड्या मारत मारत तिथून पळ काढला व प्राणी मित्रांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दोनच दिवसापूर्वी सर्पमित्र गणेश कुडगावकर यांनी गिधाडांचे देखील सुटका केली होती. त्यांच्या या धैर्यशील कामगिरीबद्दल सर्व स्तरातून नागरिक कौतुक करत आहेत.
" कांडेचोर हा प्राणी मांसाहारी आहे. याचा रंग काळा असतो व त्याच्या अंगाएवढीच त्याची शेपटी ही लांब असते. हा प्राणी दिवसा झाडांच्या फांद्यावर किंवा ढोलीत झोपतो व रात्री भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतो. त्याच कारणास्तव अर्धवट तुटलेल्या मांडामध्ये अडकुन गेल्याचे अंदाज येते." राजेंद्र भोसले (प्राणीमित्र)
Post a Comment