तळा (किशोर पितळे)
तळा पोलीस प्रशासनाकडून शनिवार व रविवारी बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याने व्यापाऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रशासनाने कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी पंधरा दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. ज्यामध्ये सोमवार ते रविवार फक्त अत्यावश्यक सेवा देणारे दुकाने सुरू राहतील.मात्र शनिवारी पोलिसांनी माईकद्वारे सूचना देऊन अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने पुर्णतःबंद करण्याचे आदेश दिले.तळा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी माधुरी मडके यांनी शनिवार व रविवार अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांना दिली होती. त्या अनुषंगाने अत्यावश्यक सेवेतील फळ विक्रेते,भाजी विक्रेते,तसेच इतर पार्सल सेवा देणाऱ्या व्यापाऱ्यांनी माल खरेदी करून शनिवारी सकाळी आपली दुकाने सुरू ठेवली होती. मात्र काही वेळातच तळा पोलीस प्रशासनाने जिल्हा अधीक्षक साहेबांचे आदेश आहेत असे सांगून अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने बंद करण्यास सांगितले. यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार असून प्रशासनाच्या या आदेशामुळे व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
"शनिवार व रविवार अत्यावश्यक सेवेतील दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेले नाहीत.मात्र मा.पोलीस अधीक्षक रायगड यांनी पोलीस निरीक्षकांना अत्यावश्यक सेवेतील दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.(माधुरी मडके मुख्याधिकारी तळा नगरपंचायत)
"मा.पोलीस अधीक्षक रायगड यांनी शनिवार आणि रविवार असे दोन दिवस पूर्णतः दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.त्या अनुषंगाने तळाबाजारपेठेतील सर्व व्यापाऱ्यांना शनिवार आणि रविवार आपली दुकाने बंद ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे.
(एस.गेंगजे पो.नि.तळा )
Post a Comment