श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
श्रीवर्धन शहरात शनिवारी रात्री चोरट्यांनी तब्बल पाच घरे फोडली आहेत. साळीवाडा, पेशवे आळी, व प्रभु वाळी अशा विविध भागात चोरट्यांनी एकाच वेळी डाव साधलेला आहे. विशेष म्हणजे सर्व घरे अतिशय गजबजलेल्या ठिकाणी आहेत. चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी पूर्ण नियोजनपूर्वक सदरचे कृत्य केल्याचे दिसून येत आहे. चोरट्यांनी चोरी करताना बंद घरे किंबहुना घरातील व्यक्ती बाहेरगावी गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर चोऱ्या केलेल्या आहेत.घराची व घरमालकाची पूर्ण माहिती, व्यवस्थित रेकी, घरातील प्रत्येक चीज वस्तूची इत्थंभूत माहिती, घरात प्रवेश करण्याचा मार्ग, तसेच घराच्या बाहेर पडण्याचा मार्ग, या सर्व बाबींचा चोरट्यांनी अभ्यास केल्याचे दिसून येत आहे. घरात चोरी करण्यासाठी चोरट्यांनी मुख्य दरवाजा चा जवळपास सर्व ठिकाणी वापर केलेला आहे. मुख्य दरवाज्याला असलेले कुलूप सोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आहे. घरातील प्रत्येक कपाट, देवघर, आणि बेडरूम सर्व ठिकाणी असलेल्या महत्त्वाच्या चीज वस्तू चोरट्यांनी चोरल्या आहेत. सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू व इतर मौल्यवान वस्तू चोरांनी चोरल्या आहेत. शनिवारी झालेल्या भुरट्या चोऱ्या मुळे श्रीवर्धनकरांच्या 2017 मधील चोरीच्या घटनांचे स्मरण झाले आहे. त्या घटनांमधील मुख्य आरोपी पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील पौड येथून ताब्यात घेतला होता. पुन्हा चार वर्षानंतर श्रीवर्धन पोलिसांच्या समोर चोरांना पकडण्याचे आव्हान उभे राहिले आहे . यावेळी झालेल्या चोऱ्यांमध्ये चोरट्याला घरातील सर्व बाबींची माहिती असल्याचे दिसून येत आहे. त्या कारणास्तव स्थानिक गुन्हेगारांचा वापर करून सदरच्या चोऱ्या झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
रविवारी सायंकाळपर्यंत पोलीस प्रशासनाकडून चोरी झालेल्या घरांची पंचनामे करण्याचे काम सुरू होते.
Post a Comment