पथदिव्यांची थकीत वीज बिले भरा अन्यथा पुरवठा खंडीत
मकरंद जाधव-बोर्लीपंचतन
श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे त्यांच्या हद्दितील पथदिव्यांच्या वीज बिलाची फेब्रुवारी २०२१ अखेर सुमारे चार कोटी एकावन्न लाख रुपये एवढी थकबाकी असुन ग्रामपंचायतीने वीज देयके भरुन महावितरणला सहकार्य करावे अन्यथा पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात येईल असे पत्र महावितरणकडुन संबंधीत ग्रामपंचायतींना बजावल्याने ग्रामपंचायतींना शाॕक बसला आहे.
दिवसेंदिवस थकबाकीचा डोंगर वाढत चालल्याने दैनंदीन कामकाज चालवणे महावितरणला अशक्य होत आहे. त्यामुळे नाईलाजाने हे पाउल उचलावे लागत आहे असे महावितरणकडुन सांगण्यात येत आहे.
ग्रामपंचायतींच्या हद्दीतील पथदिव्यांचे थकित वीज बिल ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून,केंद्राच्या वित्त आयोगातून किंवा इतर निधीतून भरावे,असे पत्र ग्रामविकास विभागाने काढले आहे. मात्र ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती बघता हे निर्देश मागे घ्यावे व हि वीज बिले पुर्वीप्रमाणे जिल्हा परिषदेकडुनच भरुन घ्यावीत असे पत्र सरपंच परिषदेकडुन उर्जा मंत्र्यांना देण्यात आले आहे.
ग्रामपंचायतींना वित्त आयोगातुन केंद्राकडुन येणारा निधी हा पन्नास टक्के बंधीत व पन्नास टक्के अबंधित स्वरुपात असतो त्याचे नियोजन पाणीपुरवठा,स्वच्छता,आरोग्य,शिक्षण,महीला बाल कल्याण,प्रशासकीय खर्च तसेच अपंग,मागासवर्गीयांसाठी विविध योजना यावर खर्च केला जातो त्यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातुन सदरची वीजबिले भरणे ग्रामपंचायतींना शक्य नसल्याचे सांगीतले जात आहे.अशा परिस्थितीत महावितरणकडुन पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडीत झाला तर ऐन होळीच्या सणामध्ये गावातील रस्त्यांवर अंधार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
"येत्या होळीच्या सणामध्ये आमच्या ग्राहकांना व नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी ग्रामपंचायतींनी केंद्राकडून येणाऱ्या वित्त आयोगाच्या निधीतून पथदिव्यांच्या वीज बिलाच्या थकबाकीतील तुर्तास दोन ते तीन लाख रुपये एवढी रक्कम भरुन महावितरणला सहकार्य करावे अन्यथा नाईलाजाने आम्हाला पथदिव्यांचा वीजपुरवठा बंद करावा लागेल व तशी कारवाई आम्ही येत्या दोन-तीन दिवसांत सुरु करीत आहोत."
श्री.महेंद्र वाकपैंजण, उप कार्यकारी अभियंता, महावितरण श्रीवर्धन विभाग
"आमच्या ग्रामपंचायतीला पथदिव्यांचे सहा लाख रुपये बिल आले आहे.ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न हे खूपच कमी असल्याने विकास कामांसाठी येणाऱ्या निधीतून जर आम्ही पथदिव्यांची वीज बिले भरली तर विकासकामांसाठी निधी कमी पडेल त्यामुळे तालुक्यातील असो की जिल्ह्यातील,पथदिव्यांची वीजबिले हि पूर्वीप्रमाणे जिल्हा परीषदेनेच भरावी अशी आमची मागणी आहे"-हरीओम चोगले, सरपंच भरडखोल ग्रामपंचायत

Post a Comment