टीम म्हसळा लाईव्ह
म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यातील समाविष्ट मंडळ व तलाठी सजे यांना स्वत:चे कार्यालय उपलब्ध नसल्याने सामान्य नागरिकांना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध होत नव्हत्या. त्यामुळे म्हसळा तालुक्यातील खामगाव, वावे, देवघर, पांगळोली व वारळ आणि श्रीवर्धन तालुक्यामधील निगडी, जसवली, रानवली, मेघरे, बोर्ले, सर्वे, दिघी, बोर्ली-पंचतन, दिवेआगर, गालसुरे, मारळ, शिरवणे व वडवली या गावांच्या संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांनी तलाठी/मंडळ अधिकारी, तलाठी सजा कार्यालयाच्या इमारतींच्या बांधकामासाठी शासकीय जमिनीची मागणी केली होती.
शासकीय कार्यालयांची स्वत:ची इमारती असावी, जेणेकरुन जनतेला योग्य सोयी-सुविधा गतीने पुरविता येतील, या उद्देशाने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाचा पाठपुरावा करुन जिल्हा प्रशासनास त्याप्रमाणे निर्देश दिले.
त्यानुषंगाने म्हसळामधील खामगाव, वावे, देवघर, पांगळोली व वारळ या गावांमध्ये प्रत्येकी 0.0300 हेक्टर आर जमीन आणि अशाच प्रकारे श्रीवर्धन तालुक्यामधील निगडी, जसवली, रानवली, मेघरे, बोर्ले, सर्वे, दिघी, बोर्ली-पंचतन, दिवेआगर, गालसुरे, मारळ, शिरवणे व वडवली या गावांमध्येही प्रत्येकी 0.0300 हेक्टर आर जमीन हस्तांतरित करण्याविषयीचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पारित केले आहेत.
या निर्णयामुळे म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांना शासकीय सोयी-सुविधा मिळण्यासाठी निश्चितच गती प्राप्त होईल. शासकीय कार्यालयांसाठी स्वतःची शासकीय वास्तू असावी,यासाठी गेल्या काही महिन्यांपासून पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जातीने लक्ष देऊन अनेक शासकीय कार्यालयांचे प्रश्न मार्गी लावले आहेत.
000000
Post a Comment