माणगाव-श्रीवर्धन एसटीमध्ये महिलेने दिला बाळाला जन्म

 
आई आणि बाळ दोघेही सुखरुप
 
माणगाव प्रतिनिधी
 एसटीने प्रवास करणार्‍या श्रीवर्धन येथील एका महिलेने एसटीमध्येच बाळाला जन्म दिल्याची घटना घडली. चालक, वाहक आणि प्रवाशांनी समयसुचकता दाखवत तिला रुग्णालयात दाखल केले. आई आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत.
 
श्रीवर्धन कोंड येथे राहणारी वैष्णवी शिगवण ही गरोदर महिला मंगळवारी (23 मार्च) सकाळी माणगाव येथे सोनोग्राफी करण्यास आली होती. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर घराकडे जाण्यासाठी ती माणगाव-श्रीवर्धन या एसटीमध्ये जाऊन बसली. एसटी विहुले कोंड येथे आली असता वैष्णवीला प्रसुती वेदना सुरू झाल्या.
 
प्रसुती कळा सुरू झाल्याने एसटी बसमधील महिला प्रवाशांनी एकत्र येऊन तिची प्रसुती केली. त्यानंतर चालकाने एसटी साई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेली. त्याठिकाणी बाळ आणि मातेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. संदीप भालके यांनी तेथे प्राथमिक उपचार केले.
 
वैष्णवी हिची प्रसूती मुदतीपूर्वीच झाल्याने बाळाचे वजन कमी भरले. त्यामुळे पुढील उपचारासाठी माता आणि बाळाला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. आई आणि बाळ दोघेही सुखरूप असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एसटी चालक, वाहक आणि प्रवासी यांनी प्रसंगावधान राखून त्वरित महिलेची मदत केली, त्यामुळे या सर्वांचे कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा