भेंडी बंदर जेट्टीजवळील घटना ; पोहायला गेला असताना घडली दुर्घटना
श्रीवर्धन । श्रीवर्धनमधील भेंडी बंदर जेट्टीजवळील पाण्यात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या 21 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. नदीम मुस्तफा दिवेकर (वय 21) असे मृत तरुणाचे नाव आहे. तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने दिवेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
नदीम त्याचा भाऊ व मित्रांसोबत शुक्रवारी (19 मार्च) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भेंडी बंदर येथे पोहोयला गेला होता. मात्र भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडायला लागला. नदीमच्या भावाने व मित्राने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही आणि नदीम पाण्यात बेपत्ता झाला. या घटनेची माहिती मिळताच श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश रसेडे, तहसीलदार सचिन गोसावी यांनी टीमसह घटनास्थळ गाठले. तेथे स्थानिकांच्या मदतीने तात्काळ शोधकार्य सुरू केले.
या शोधकार्यात संपूर्ण पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, नगरपालिका अधिकारी, सागरी सुरक्षा पथक व सात स्थानिक बोटी व नागरिक पूर्ण दिवस व रात्री उशिरापर्यंत नदीमचा शोध घेत होते. परंतु नदीम सापडला नाही. आज (20 मार्च) सकाळी शोधकार्य सुरु असताना सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नदीमचा मृतदेह पाण्यात दिसून आला. त्यानंतर शोधपथकाने नदीमचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.
श्रीवर्धन पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. या घटनेचा तपास श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेश रसेडे करत आहेत.
दरम्यान, उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे नदीम दिवेकरचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेने दिवेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Post a Comment