खलाटीतले गणपती मंदिर स्वछता मोहीम



राम भोस्तेकर माणगाव

 निजामपूर गावाजवळील जवळील मांडवरकरवाडीच्या पायथ्याशी खलाटी(कोकणातील शेती व तत्सम बाबीकरता वापरली जाणारी जागा) असलेल्या प्राचीन गणपती मंदिराची स्वछता शिवशंभू मंडळाच्या सदस्यांनी व श्री गणेश भक्तांनी केली. आज १४ फेब्रुवारी असल्याने आजची इंग्रजाळलेली तरुणाई व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात गुंतलेली असताना परिसरातील तरुण मंडळींनी केलेली साफसफाई आणि सजावट खरोखरच लक्षवेधक ठरते. वाढलेले गवत, छोटी काटेरी झुडुपे, पावसाळ्यात वाढलेल्या वेली, फरशीच्या फटीतून अस्तित्व निर्माण करू पाहणारी रानटी रोपटी काढून टाकून, झाडून पुसून मंदिर गाभारा आणि परिसर स्वच्छ करण्यात आला. संध्याकाळी पुन्हा जाऊन सुंदर सजावट करण्यात आली. 

     हे संपूर्ण मंदिर गावापासून काहीसे दूर असल्याने दुर्लक्षित राहिले आहे. निसर्गाच्या कुशीत दाट झाडीमध्ये ऊन, वारा, पाऊस आणि जंगली श्वापदे यांचा आघात सहन करत हे मंदिर आजही इतिहासाची साक्ष देत उभे असलेले दिसून येते. हे छोटेसे मंदिर/ देऊळ दगडी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. आपल्या मुलांना जरूर दाखवावा असा आहे.  बहुतांश हिंदू मंदिरांच्या मुख्य प्रवेशद्वारावर वरील बाजूस मध्यभागी गणपतीचे छोटेसे शिल्प कोरलेले आढळते तसे इथेही आहे. आत शिरताना प्रथम गणपतीचे स्मरण करून मगच मुख्य देवतेचे दर्शन घ्यावे अशी रीत असे. बाजूला दोन दोन फुले आणि दोन मोर कोरलेले आढळतात. मोर हा पक्ष्यांचा राजा आहेच तसेच तो लक्ष्मीचे वाहन देखील असल्याने प्राचीन काळापासून त्याला मानाचे आणि पवित्र स्थान दिलेले दिसून येते. मंदिराचा वरील कळसाचा भाग देखील आखीव रेखीव नक्षीदार असल्याचे दिसते. मात्र सध्यस्थीतीला हाच भाग जास्त क्षतीग्रस्त झालेला आहे. कोकणात पाऊस अतीमुसळधार पडत असल्याने त्यावर प्लास्टिक कापड बांधलेले आढळले. मात्र याकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे नाहीतर पावसाच्या माऱ्याने एक एक चिरा दुभंगून अलग होऊन हा अनमोल ठेवा नष्ट होण्याची भीती आहे. मंदिराच्या समोरील आवारात असलेल्या पायरीवर देखील फुलाची नक्षी कोरलेली दिसते. तसेच पायरीचे दोन्ही कठडे रेखीव कोरलेले आहेत. मंदिराच्या तीन कोपऱ्यावर विशिष्ट खाच असलेले चौकोनाकृती दगड बसवलेले आढळले त्यांचा उपयोग मंदिरावरील आच्छादन किंवा सभामंडप उभारणीसाठी केला जात असावा. समोरील जागा सभामंडपासाठी, धार्मिक कार्य करण्यासाठी वापरली जात असावी. त्यावर अलीकडील काळातील शहाबादी फरशी बसवलेली आहे. मात्र सभामंडपाच्या पायाचे घडीव कोने आजही सरळ रेषेत दिसतात. मंदिरात शिरताना वाकुनच आत जावे लागते. मनातील अहंकार बाहेर ठेवून लीन होऊन देवाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी ही रचना असावी. गर्भगृहात एक ते दोन व्यक्ती पूजा अभिषेक करू शकतील एवढीच जागा आहे. मुख्य मूर्ती श्री गणपतीची असून डाव्या बाजूलाच श्री शंकराची पिंडी देखील आहे. दगडी बांधकाम असल्याने बाहेरील वातावरणाचा परिणाम आत जाणवत नाही. वरती कळसाकडे पाहिल्यावर त्या काळच्या स्थापत्यकलेचा नमुना बघायला मिळतो. एकात एक कोरीव दगड अडकवत विशिष्ट पद्धतीने एकावर एक मांडत कळस बनवलेला दिसून येतो. जो आजही न दुभंगता अखंड आहे. खाली जमिनीवर फरश्या बसवलेल्या असून त्यावर एक संगमरवरी फरशी आहे जिच्यावर मंदिराचा जीर्णोद्धार सन १९६६ साली केल्याची नोंद आहे. 
     एकंदरीत अमूल्य असा हा प्राचीन ठेवा पुन्हा जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे. मंदिराची डागडुजी आणि सभामंडप झाल्यास हा दुर्मिळ ठेवा पुढील पिढीसाठी नक्कीच अनमोल असेल यात शंकाच नाही. तशी सुबुद्धी गणेश भक्तांना येवो ही श्री गणेशाच्या चरणी गणेश जयंतीच्या निमित्ताने प्रार्थना.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा