महिलांनी कायद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे अगत्याचे आहे .... अॅड.अतुल चौगुले
कुणबी समाज सभागृहात महिला कायदेविषयक शिबीर संपन्न
श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
लोकशाहीत स्त्री व पुरुष यांना समान दर्जा दिलेला आहे . भारतीय संस्कृती ही पुरुष प्रधान संस्कृती आहे. घरामध्ये बालपणापासूनच मुलगा व मुलगी असा भेद केला जातो. त्यामुळे पुरुषप्रधान संस्कृतीला चालना मिळते. आधुनिक कायदे स्त्रीच्या स्वामित्वा ला प्राधान्य देताना दिसून येतात. त्या कारणास्तव महिलांनी कायद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे अगत्याचे आहे असे प्रतिपादन वकील अतुल चौगुले यांनी केले आहे. पंचायत समिती श्रीवर्धन व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प यांनी आयोजित केलेल्या महिला कायदेविषयक शिबिरात वकील अतुल चौगुले व वकील मालिका श्रीवर्धनकर यांनी उपस्थित महिलावर्गाला संबोधित केले. अतुल चौगुले यांनी सांगितले समाजात आजमितीस स्त्रीला सन्मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. मात्र तरीसुद्धा समाजातील काही घटक आजही स्त्री चे श्रेष्ठत्व मान्य करत नाहीत. स्त्रियांना कमी लेखणे त्यांच्यावर ती अन्याय करणे असे प्रकार होताना दिसून येत आहेत घरातील हिंसाचार महिलांचा होणारा अवमान होणारा छळ याला प्रतिबंध करण्यासाठी २००५ ला घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा निर्गमित झाला. हुंड्यासाठी महिलांचा होणारा छळ संपवण्याच्या हेतूने भा द स ४९८ नुसार आरोपी व्यक्ती विरोधात गंभीर गुन्ह्याची नोंद दाखल केली जात आहे . असे अतुल चौगुले यांनी सांगितले. समाजात वावरत असताना समाजकंटकांकडून वारंवार होणारा छळ लक्षात घेऊन कायद्यामध्ये अमुलाग्र स्वरूपाचा बदल करण्यात आला. छेडछाड,शिवीगाळी,वाईट नजर, मारण्यात येणारे टोमने यास प्रतिबंध करणारा कायदा निर्माण करण्यात आला. समाजातील महिलांना सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या हेतूने स्त्रियांना योग्य न्याय देण्याच्या हेतूने कायद्यामध्ये अमुलाग्र स्वरूपाचा बदल झालेला आहे. कायदा स्त्रियांच्या संरक्षणाला स्त्रियांच्या हिताला प्राधान्य देताना दिसून येत आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी कायद्याद्वारे विधी तज्ञांची नेमणूक विविध प्रकरणांमध्ये केली गेली आहे. स्त्रियांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता कोणत्याही स्वरूपाचा अन्याय सहन करू नये. कायदा स्त्रियांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असे वकील अतुल चौगुले यांनी सांगितले. मालिका श्रीवर्धनकर यांनी उपस्थित महिलावर्गाशी विविध प्रश्नांवर चर्चा करत महिलांच्या प्रश्नांचे निराकरण केले. सदर कार्यक्रम प्रसंगी पंचायत समितीचे राजन सांबरे, ईश्वर गुणावत,एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे पदाधिकारी स्नेहा गौरी फाउंडेशन सभासद व महिला वर्ग उपस्थित होता.
Post a Comment