म्हसळा पंचायत समिती कार्यालयात कर्मचाऱ्यांचे "कभी भी आव कभी जाव".. चे धोरण..!

● शासकीय कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा कशासाठी..?

● लेट लतीफ कर्मचाऱ्यांवर वचक कोण ठेवणार..?

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

   म्हसळा तालुक्यातील शासकीय विभागात काम करणारे अधिकारी वर्ग, क्लार्क कर्मचारी, शिपाई अनेक वेळा कार्यरत असलेल्या सेवेत नागरिकांना योग्य त्या सेवा देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आलेले असून याबाबत नागरिकांच्या वेळोवेळी तक्रारी सुद्धा येत आहेत परंतु संबंधित कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी या कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचारी वर्गावर कोणत्याही प्रकारची चौकशी करून कारवाई करीत नाहीत उलट नागरिकांच्या तक्रारीकडे कानाडोळा करून दुर्लक्ष करीत असल्याची वस्तुस्थिती म्हसळा तालुक्यातील सरकारी कार्यालयात पहावयास मिळत आहे. तर विविध सेवा देताना सेवेत कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे केली असता ते देखील हा विषय गांभीर्याने न घेता एक प्रकारे अधिकारी व कर्मचारी वर्गाची पाठराखणच करीत असल्याचे दिसून येते. या सर्व परिस्थितीवरून 'तेरी भी चूप, मेरी भी चूप' ही लाजिरवाणी परिस्थिती असून म्हसळ्यातील सरकारी यंत्रणेवर संबंधित वरिष्ठ अधिकारी किंवा स्थानिक सत्ताधारी लोकप्रतिनिधी असे कोणाचेही वचक नसल्याचे दिसून येत आहे. 
एकीकडे शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देत काम करण्यासाठी 5 दिवसांचा आठवडा लागू केला आहे. शनिवार, रविवार दोन दिवस सलग सुट्टी देऊन कर्मचाऱ्यांचे ताण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
   म्हसळा पंचायत समितीत मात्र शासनाच्या नियमांची पायमल्ली होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कार्यालयात लेट लतीफ कर्मचारी उपस्थित राहत असून कधी पण या कधी पण कोण कोणाला विचारणार नाही अशी काहीशी परिस्थिती झाली असून वरिष्ठ अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे प्रशासकीय कामकाजात नियंत्रण नसल्याची स्थिती आहे. शनिवार, रविवार, सोमवार अशी तीन दिवस सलग सुट्टी असूनही मंगळवारी सकाळी पावणे अकरा वाजले असतानाही फक्त एक शिपाई वगळता इतर अधिकारी, कर्मचारी वर्ग कोणीच हजर राहिले नव्हते. नंतर हळूहळू पावणे अकरा वाजताच्या दरम्यान चार कर्मचारी हजर झाले. यावरून म्हसळा पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळेचे महत्व किती आहे हे लक्षात येते तसेच या लेट लतीफ कर्मचाऱ्यांना कोणीही बोलणारे नसल्याने पंचायत समिती कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी "कभी भी आव, कभी भी जाव" असे धोरण अवलंबले आहे की काय अशी शंका उपस्थित होत असून म्हसळ्यात शासकीय कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा नेमका कशासाठी आहे आणि या लेट लतीफ कर्मचाऱ्यांवर वचक कोण ठेवणार..?असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रतिक्रिया :-

"मी आज गावी असून माझ्या एका नातेवाईकाला हृदय विकाराचा झटका आला असल्याने तिकडे जावे लागले आहे. पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उशिरा येण्याच्या उपस्थिती बाबत चौकशी करून आवश्यकतेनुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल."
वाय.एम.प्रभे
गटविकास अधिकारी - पंचायत समिती म्हसळा


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा