म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
वर्षभरात साजरे होणारे सण उत्सव कायदा आणि सुव्यवस्था सांभाळून पहारा देणाऱ्या पोलिस मित्र आणि अधिकारी वर्गाला सर्वसामान्य जनतेप्रमाणे आपापल्या कुटूंबा सोबत साजरा करता येत नाही हा उद्देश दृष्टीस ठेवून म्हसळा प्रेस क्लब सदस्य दरवर्षी पोलिसांकरिता घरगुती फराळ कार्यक्रम संपन्न करतात. दिनांक 14 नोव्हेंबर रोजी दिपावलीच्या शुभमुहूर्तावर म्हसळा पोलिस ठाण्यात पोलिसांबरोबर दिवाळी फराळ, फराळ आणि संवाद असा उपक्रम साजरा करण्यात आला. पोलीस ठाण्यातच पोलिसांना दिवाळीत घरगुती बनवलेले फराळ खाण्याचा कार्यक्रम म्हसळा प्रेस क्लबच्या वतीने संपन्न झाला या स्तुत्य उपक्रमाचे उपस्थित पोलिस अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने मनोमन धन्यवाद दिले.
सहाय्यक पोलिस निरीक्षक धनंजय पोरे यांनी मनोगत व्यक्त करताना कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी जशी जनतेच्या सहकार्याची गरज असते तशी पत्रकारांच्या सहकार्याची देखील गरज पोलिस यंत्रणेला असते असे सांगून पोलिसांना सणासुदीला कधी कधी दिवस रात्र ड्युटी करावी लागते त्या वेळी त्यांना वर्षभरात येणारे सण, उत्सव आपल्या कुटुंबा सोबत साजरा करता येत नाहीत. कामावर असताना मनात कितीही इच्छा असली तरी सार्वजनिक कार्यक्रमात इतर नागरिकांप्रमाणे सहभाग घेता येत नाही. एखाद उत्सवाच्या ठिकाणी बंदोबस्तास असलेले आमचे पोलीस मित्र त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी फक्त उभे राहत डोळ्यासमोर सण उत्सवाचा आनंद लुटत असतात अशी भावना व्यक्त केली. गेल्या 10 वर्षाच्या पोलिस सेवेत पहिल्यांदाच दिवाळीत पोलिस आणि पत्रकार असा आगळा वेगळा कार्यक्रम अनुभवयास मिळाला. कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस आणि पत्रकार यांच्यामध्ये नेहमीच संवाद असणे आवश्यक आहे. आजचा दिवाळी फराळ कार्यक्रम प्रेरणादायी ठरेल असे मत सपोनि धनंजय पोरे यांनी व्यक्त केले.
जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे यांनी मनोगत व्यक्त करताना कधी कधी पोलिस आणि पत्रकार यांच्यात मोठा दुरावा निर्माण होतो तो म्हसळा तालुक्यात पहायला मिळत नाही. पत्रकारांवर खोटे आरोप किंवा हल्ले करणाऱ्यांनी पत्रकारांची भूमिका समजून घेतली पाहिजे. पोलीस कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात त्यांचा सर्वांनीच आदर केला पाहिजे तसेच पोलीस यंत्रणेकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशिल यादव यांनी तर अशोक काते यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला सहाय्यक पोलिस निरीक्षक धनंजय पोरे, पीएसआय धुस,जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे,प्रेस क्लब अध्यक्ष शशिकांत उर्फ बाबु शिर्के, माजी अध्यक्ष पत्रकार अशोक काते, पत्रकार सुशिल यादव,पत्रकार श्रीकांत बिरवाडकर,पत्रकार अरुण जंगम, पोलीस नाईक सुर्यकांत जाधव,संदीप चव्हाण, श्याम कराडे, मढवी आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment