दिल्ली निवासी इस्लामिक रिलीफ व इंडो-ग्लोबल सोशल सर्व्हीस सोसायटी संस्थेमार्फत स्वच्छता साहित्याचे वाटप.


दिल्ली निवासी इस्लामिक रिलीफ व इंडो-ग्लोबल सोशल सर्व्हीस सोसायटी संस्थेमार्फत म्हसळा तालुका आदिवासी कुटुंबियांना निवारा व स्वच्छता साहित्याचे वाटप.

म्हसळा  : श्रीकांत बिरवाडकर

दि.3 जून 2020 रोजी ‘निसर्ग चक्रीवादळाने’ कोकण किनारपट्टीवरील गावांना नुकसानीचा मोठा तडाखा बसला होता त्यामुळे वनातील झाडे, वन्यजीव,पाळीव पशुपक्षी, निवारा, फलबागायत, विज वितरण, रस्ते बांधकाम, सार्वजनिक इमारती आदींचे कोट्यावधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.या मध्ये सर्व समाज स्तरातील लोकांचे अतोनात नुकसान झाले. रानावनात वास्तव्य करीत असलेले आदिवासी वाड्या,खाडी लगत असलेले कोळी वाडे व मोलमजुरी करणारे मुस्लीम, दलित आणि भटक्या-विमुक्त जमातींच्या कुटुंबियांचे ज्यांच्याकडे उपजीविकेचे साधन नाही अशा कुटुंबांची घरे व घरातील सामानांचे नुकसान झाल्या कारणाने त्यांचा संसार अस्ताव्यस्त झाला होता.लोकांच्या मदतीला या वेळी महाराष्ट्र शासन धावून आला त्या बरोबरच अनेक सामाजिक सेवाभावी संस्था मदतीला धावल्या "एक हात आपलाही मदतीचा" या उद्देशाने दिल्ली स्थित इंडो-ग्लोबल सोशल सर्व्हीस सोसायटी मार्फत इस्लामिक रिलीफ वर्ल्डवाईड ह्या जागतिक स्तरावरील संस्थेने पुढे होऊन मोठया प्रमाणात साहित्य वाटपाची मदत देवु केली आहे.रोह्यातील स्नेहवर्धिनी सोशल ट्रस्ट तसेच म्हसळा येथील सामर्थ्य संस्थेच्या सहाय्याने रोहा, पेण,तळा व म्हसळा या तालुक्यात वाड्यावस्त्यातील 2710 कुटुंबांना मदत देण्याचे काम केले असल्याचे स्वयंसेवक कल्याण जाधव यांनी माहिती देताना सांगितले.मदतीमध्ये निवाऱ्याकरिता दोन ताडपत्र्या,दोरखंड,दोन मच्छरदाण्या,स्वच्छता राखण्यासाठी डसबीन,मग,साबण,धुण्याचा सोडा,पाणी निर्जंतुक करण्यासाठीच्या गोळ्या,मास्क,सानिटायजर आदि साहित्याचे वाटप करण्यात आले.संस्थेच्या वतीने म्हसळा तालुक्यात 32 वाड्यांतील 1353 कुटुंबापर्यंत वरीलप्रमाणे साहीत्य वाटप करण्यात आले. स्नेहवर्धिनी सोशल ट्रस्टने रोहा,तळा व पेण तालुक्यात 2357 कुटुंबांना मदत देवु केली.करण्यात आलेली मदत एकंदरीत एक कोटी रुपयांची असल्याचे इस्लामिक रिलीफ वर्ल्डवाईड संस्थेच्या सदस्यांनी माहिती देताना सांगितले.

 दिवसभर कष्ट करून रात्री घरी मच्छरमुळे नीट झोप लागत नाही. संस्थेने आम्हाला मच्छरदाणीची मोफत व्यवस्था केली त्या मुळे आमच्यासह मुलाबाळांना चांगली झोप लागते सेवाभावी संस्थेचे खूप आभारी असल्याचे म्हसळा येथील लाभार्थी सुजा काझी यांनी मनोगतात व्यक्त केले.

 “लाभार्थ्यामध्ये ह्या मदतीने कृतज्ञतेची भावना असून अशा प्रकारच्या मदतीने त्यांचे राहणीमान सुधारण्यास तसेच स्वच्छता पाळण्यात मोलाची मदत होणार आहे असे मत स्नेहवर्धिनी संस्थेच्या सिस्टर ब्रिजित यांनी व्यक्त केले. सामर्थ्य संस्थेच्या मुख्याधिकारी रंजिता पवार यांनी आम्ही राबविलेल्या लोकांनी आणि प्रशासनाने चांगले सहकार्य केले असल्याचे प्रतिपादन केले. या कामी आदिवासी विभागातील कर्मचारी कल्याण जाधव यांनी विशेष प्रयत्न करून आदिवासी कुटुंबापर्यंत पोहोचण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. हरीशचंद्र मांडवकर,महेश माने व तेजश्री रिकामे यांच्या प्रयत्नांने व एल.पी.खोत यांच्या मार्गदर्शनाने हे कार्य यशस्वी झाले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा