( टिम म्हसळा लाईव्ह):- या वर्षात राज्यावर करोना, अतिवृष्टी अशी विविध नैसर्गिक संकटे आली. मात्र सर्वांनी संयम बाळगून शासनाला उत्तम सहकार्य केले आहे. हे शासन शेतकऱ्यांचे असून शासनाचे धोरण शेतकऱ्यांना मदतीचेच आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी आज येथे केले.
जिल्ह्यातील करंजा जेट्टी, रेवस जेट्टी येथील बांधकामाची पाहणी तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी ते रायगड जिल्हा दौऱ्यावर आले होते, त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, तहसिलदार विशाल दौंडकर, तहसिलदार सतिश कदम, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे जिल्हा समन्वयक श्री.रत्नशेखर गजभिये आदि उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री.सत्तार पुढे म्हणाले, शेतकऱ्यांकडे सर्वांनीच मदतीच्या भावनेने पाहणे गरजेचे आहे. त्यांना आधार देणे आपल्या सर्वांचे कर्तव्यच आहे. प्रशासनाने पंचनामा करताना एकाही नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या जमिनीचा पंचनामा राहणार नाही, याची विशेष खबरदारी घ्यावी. पोल्ट्रीशेडचे नुकसान झालेल्या पोल्ट्रीधारक शेतकरी तसेच गणपती मूर्ती कारखानदार यांना मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी निश्चित चर्चा करुन प्रयत्न केले जातील. त्याचप्रमाणे शेतीचे जुने बांध फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्याची सविस्तर माहिती घेऊन जुन्या बांधाची दुरुस्ती तर आवश्यक तिथे नवीन बांध बांधण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलून शेतकऱ्यांना निश्चित मदत केली जाईल.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी राज्यमंत्री श्री. सत्तार यांना परतीच्या पावसामुळे जीवित व वित्त हानीबाबतची माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यात एकूण 3 व्यक्ती मयत झाल्या, 5 पशुधनाची हानी झाली असून 314 घरांचे नुकसान झाले, तर अंदाजे 83 हजार 800 शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले आहे.
महाराजस्व अभियान अंमलबजावणीबाबत माहिती देताना सन 2019-20 मध्ये रायगड जिल्ह्यात महाराजस्व अभियान शासनाच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आले होते, यामध्ये प्रलंबित फेरफार नोंदी पूर्ण करणे, शर्तभंग तपासणे, शेत रस्ते मोकळे करणे, सरकारी जागांवर अतिक्रमणे निश्चित करणे, दाखले देण्यासाठी शिबिरे आयोजन व कर्मचाऱ्यांची अभिलेख जतन करणे याबाबत अभियान उत्तमरित्या राबविण्यात आले. तर सन 2020-21 मध्ये शासनाच्या धोरणाप्रमाणे अभियानाची अंमलबजावणी करून महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी राज्यमंत्री महोदयांना सांगितले.
“माझे कुटुंब-माझी जबाबदारी” या योजनेंतर्गत दि.25 सप्टेंबर 2020 ते 15 ऑक्टोबर 2020 या दरम्यान जिल्ह्यातील 7 लाख 96 हजार 22 कुटुंबातील 31 लाख 30 हजार 223 नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली . यासाठी 1 हजार 109 पथके कार्यरत होती, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी यावेळी दिली.
शेवटी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कोविड, निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी या एकामागून एक आलेल्या सर्व संकटातही पालकमंत्री कु.आदिती तटकरे व इतर लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
Post a Comment