दोन वर्षांपासून होता फरार; येवला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
टीम म्हसळा लाईव्ह
दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिरावर दरोडा टाकून दोन सुरक्षारक्षकांच्या हत्येप्रकरणी मोक्का न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना दोन वर्षांपूर्वी पोलिसांच्या हातातून निसटून जाण्यास यशस्वी ठरलेल्या अट्टल गुन्हेगाराला अखेर येवला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
वयाच्या 19 वर्षांपासून गुन्हेगारीकडे वळून राज्यात संघटीत गुन्हेगारीची बिजे पेरून खून, दरोडे, खुनासह दरोडे, घरफोड्या, जबरी लूट यांसारखे गंभीर स्वरुपाचे राज्यातील विविध जिल्ह्यांत 28 गुन्हे दाखल असलेला विशेष मोक्का न्यायालयाने सुनावलेल्या डझनभर आरोपींपैकी एक असलेला सतीश उर्फ सत्या जैनू काळे (26, रा.बिलवणी, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद) यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
काळे हा नागपूर येथील कारागृहात शिक्षा भोगत असताना 2018 साली एका खटल्याच्या सुनावणीसाठी त्यास निफाड सत्र न्यायालयात पोलिसांनी हजर केले होते. सुनावणी पूर्ण होताच त्यास पोलीस बंदोबस्तात रेल्वेतून नागपूरला घेऊन जात असताना भुसावळ रेल्वेस्थानकावर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन काळे फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या शोधात होते.
19 ऑक्टोबरला येवला तालुका पोलीस हद्दीत झालेल्या घरफोडीप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली होती. सुरुवातीला त्याने त्याचे नाव शिवा जनार्दन काळे असे सांगितले होते.
मात्र अधिक चौकशीत तो 2012 साली झालेल्या सुवर्ण गणेश सशस्त्र दरोडा प्रकरणातील फरार आरोपी सतीश उर्फ सत्या जैनू काळे असल्याचे सिद्ध झाले. 2018 ला पोलिसांच्या तावडीतून पळून गेल्यानंतर तो नाव बदलून राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
Post a Comment