मसुरेत सापडले प्राचीन कातळशिल्प



भूषण मेतर- मालवण

मालवण तालुक्यात कुडोपी, हिवाळे, असरोंडी आदी ठिकाणी प्राचीन काळातील मानवाच्या अस्तित्वाची साक्ष देणारी ऐतिहासिक अशी कातळशिल्पे आढळून आली असताना तालुक्यातील मसुरे डांगमोडे - मालोंड बेलाचीवाडी या भागात असणाऱ्या माळरानावरही एक प्राचीन असे कातळशिल्प आढळून आले असून स्थानिक रहिवासी शशांक ठाकूर, विष्णू ठाकूर, स्वप्नील ठाकूर या भावांनी या शिल्पाची माहिती सर्वांसमोर आणली आहे. डांगमोडेच्या माळरानावरही कातळशिल्प आढळून आल्याने मालवण तालुक्याचा प्राचीन काळातील इतिहास समृद्ध असल्याचा एक अमूल्य ठेवा हाती लागला असून यामुळे इतिहास संशोधकांना संशोधनासाठी इतिहासाचा आणखी एक खजिना उलगडला गेला आहे.

निसर्गसंपन्नतेने नटलेल्या आणि पर्यटनाची राजधानी म्हणून ओळख असलेल्या मालवण तालुक्याला समृद्ध असा प्राचीन इतिहासही लाभला आहे, हे येथील काही ठिकाणी सापडलेल्या प्राचीन अशा कातळशिल्पवरून लक्षात येते. या कातळ शिल्पांमधील आकृत्या, त्यांची रचना व मांडणी तसेच त्यातील चित्राकृती लक्षात घेता ही कातळ शिल्पे आदी मानवाच्या काळातील असल्याचा प्राथमिक अंदाज इतिहास संशोधकांनी वेळोवेळी मांडला आहे. कोकण पट्यात रत्नागिरी व सिंधुदुर्ग ह्या दोन जिल्ह्यात अशी कातळ शिल्पे अनेक ठिकाणी सापडून आली आहेत. बहुतांशी कातळ शिल्पे ही उंच अशा माळरानावर म्हणजेच सड्यावरील कातळात कोरलेली असल्याने त्यांना कातळ शिल्पे असे संबोधले जाते. मालवण तालुक्यात मोठ्या प्रमाणावरील कातळ शिल्पे कुडोपीच्या माळरानावर आढळून येतात. तसेच हिवाळे येथे प्राचीन गुहा, घुमडे येथील प्राचीन काळातील दगडांच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा रचना, असरोंडी येथे अलीकडे शोध लागलेली कातळ शिल्पे असा प्राचीन काळातील अमूल्य ठेवा तालुक्यात दिसून येतो. या कातळ शिल्पांच्या शोधामुळे तालुक्यात प्राचीन काळात आदी मानवाचे असलेले अस्तित्व त्याची समृद्ध अशी कातळ शिल्प व कोरीव काम कला आणि स्थलांतराची वृत्ती या कारणांमुळे तालुक्यात अन्य ठिकाणीही आदीमानवाच्या इतिहासाच्या पाऊल खुणा असल्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने इतिहास संशोधक अशा गोष्टींचा शोध घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर मसुरे डांगमोडे- मालोंड बेलाची वाडी येथील माळरानावर देखील एक प्राचीन असे कातळशिल्प आढळून आले आहे. या गावचे स्थानिक रहिवासी शशांक ठाकूर, विष्णू ठाकूर व स्वप्नील ठाकूर यांनी या कातळशिल्पाची माहिती युट्युब व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांच्या समोर आणली आहे.

मुंबईत कानानिमित्त राहणारे डांगमोडे येथील शशांक ठाकूर हे लॉकडाऊन मुळे गावी आल्यावर सध्या गावी शेतीच्या कामात रमले आहेत. तालुक्यातील कातळशिल्पांबाबत माहिती असणाऱ्या शशांक यांनी अशाच प्रकारची शिल्पे आपल्या गावातही असतील का या विचाराने आपण गावातील जुनी जाणती माणसे तसेच माळरानावरील धनगर समाजातील व्यक्तींकडे विचारणा केली. याबाबत त्यांचे चुलत भाऊ विष्णू ठाकूर यांनी माळरानावरील शिल्पा बाबत माहिती दिली असता त्यांनी त्याची पाहणी केली. त्याची आकृती लक्षात यावी यासाठी शशांक यांनी भाऊ स्वप्नील व विष्णू याच्या समवेत कातळशिल्पवर वाढलेले गवत काढून साफसफाई केली. या शिल्पाचा आकार बदामा सारखा असून आकृतीच्या वरच्या व खालच्या बाजूला दोन खड्ड्यांसारखी छिद्रेही खोदलेली आहेत. याच माळरानावर अन्य काही ठिकाणी खोदाई केलेले खड्डे दिसून आले असून त्याकाळात पाणी साठवणुकीसाठी असे खड्डे खोदले गेले असावेत असा अंदाज शशांक ठाकूर यांनी व्यक्त केला.


याबाबत माहिती देताना विष्णू ठाकूर म्हणाले, आपण लहान असल्यापासून हे कातळशिल्प पाहत आलो आहोत. मात्र त्याच्या विषयी आपल्याला कोणतीही माहिती नसल्याने एक आकृती म्हणूनच त्याकडे पाहत आलो. या आकृतीला पूर्वज घोड्याचा पाय असे म्हणायचे असेही विष्णू ठाकूर यांनी सांगितले. तर या कातळशिल्पाच्या आकाराची शिल्पे कुडोपी येथेही आढळून येतात. या आकाराला संशोधकांच्या भाषेत गोपद्म असे म्हटले जाते, डांगमोडेच्या माळरानावर अशाप्रकारचे हे एकच शिल्प सापडले असून अन्य कोणतेही शिल्प सापडून आलेले नाही, मात्र तरीही आजूबाजूच्या परिसरात अशी शिल्पे असण्याची शक्यता आहे, असे शशांक यांनी सांगितले.

मालवण तालुक्यात आणखी काही ठिकाणी अशा प्रकारची कातळशिल्पे सापडू शकतात. मात्र अशा शिल्पांबाबत ग्रामस्थांमध्ये तेवढी जागरूकता व माहिती दिसून येत नाही. मात्र अशा शिल्पांचा शोध घेणे गरजेचे असून इतिहास संशोधकांची यामध्ये महत्वाची भूमिका राहणार आहे. डांगमोडे येथील या कातळशिल्पाचा संशोधकांनी सखोल अभ्यास व संशोधन करावे. स्थानिक प्रशासनाने ही जागा संरक्षित करावी. आदिमानवाच्या कलेचा हा खजिना सर्वांनी जोपासत पुढच्या पिढी पर्यंत माहिती पोहचवली पाहिजे, असे मत शशांक ठाकूर यांनी व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा