'...आणि रामदास बोट बुडाली!' या साहित्यिक-पत्रकार उमाजी केळुसकर यांच्या भारतीय भाषांतील पहिल्या मराठी कादंबरीच्या हस्तलिखिताचे पूजन
टीम म्हसळा लाईव्ह
रामदास बोटीच्या जलसमाधीच्या घटनेवर आधारित साहित्यिक-पत्रकार उमाजी मदन केळुसकर यांनी लिहिलेल्या कादंबरीच्या हस्तलिखिताचे प्रकाशनपूर्व पूजन बुधवारी (दि. २८) भालनाका ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष श्रीरंग घरत व सौ. अपर्णा श्रीरंग घरत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी निलेश नाईक यांची उपस्थिती होती.
गुरुवार, १७ जुलै १९४७ रोजी दीप अमावस्येच्या दिवशी रामदास बोटीने रेवसजवळील काशाच्या खडकाजवळ जलसमाधी घेतली. या अपघातात बोटीतून प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. रामदास बोटीच्या जलसमाधीवर गेल्या ७३ वर्षांत भारतामध्ये कोणत्याही भाषेत कोणतीही साहित्यकृती तयार झाली नाही. म्हणूनच '...आणि रामदास बोट बुडाली!' ही उमाजी मदन केळुसकर यांची लवकरच प्रसिद्ध होणारी कादंबरी मराठी भाषेतील पहिली साहित्यकृती ठरते. या कादंबरीचे पूजन भालनाका ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष श्रीरंग घरत यांच्या भूते येथील निवासस्थानी झाले. त्यांचे वडील पांडुरंग पोसू घरत यांचा रामदास बोट अपघातात मृत्यू झाला होता. रामदास बोटीचे स्मारक व्हावे यासाठी श्रीरंग घरत धडपडत आहेत. त्यांच्या या धडपडीचा सन्मान करण्यासाठी, त्यांच्या वडिलांसह मृत्युमुखी पडलेल्या शेकडो कोकणवासियांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांच्या हस्ते कादंबरीच्या हस्तलिखिताचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी या कादंबरीचे लेखक उमाजी मदन केळुसकर यांनी त्यातील काही प्रकरणांचे अभिवाचनही केले.
Post a Comment