म्हसळा शहर दिघी नाका ते तोंडसुरे रस्त्याची धूळधाण


म्हसळा शहर दिघी नाका ते तोंडसुरे रस्त्याची धूळधाण 

● जे.एम.म्हात्रे कन्ट्रक्शन व दिघी पोर्ट विकासक यांचे रस्ता देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष

● मोठे अपघात घडण्याची शक्यता

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यातील मुख्य दिघी नाका पासून ते तोंडसुरे गावापर्यंतच्या मुख्य रस्त्यावर जागोजागी भले मोठमोठे खड्डे पडले असल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून या रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले असून रस्त्याची दयनीय अवस्था होऊन धूळधाण उडाली आहे. लॉकडाऊन काळात आणि काही दिवसांपूर्वी पावसाचा जोर जास्त असल्याने या रस्त्याची डागडुजी व दुरुस्ती करण्याच्या कामाकडे संबंधित खात्याने लक्ष दिले नव्हते परंतु आता पाऊस कमी झाला आहे तरीही या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम संबंधित अधिकारी व यंत्रणा करीत नाहीत त्यामुळे या मार्गावर प्रवास करणारे नागरिक हैराण झाले आहेत. रोज काही ना काही छोटे मोठे अपघात या मार्गावर होत आहेत. म्हसळा शहर, खारगाव खुर्द, तोंडसुरे, जंगम वाडी, आगरवाडा, पेडांबे, साळवींडे, मेंदडी व पुढे दिघी व्हाया बोर्ली, श्रीवर्धन या भागाकडे रिक्षा, मोटारबाईक व इतर प्रवाशी साधन वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कंबरडेमोड करून प्रवास करावा लागत आहे. या मुख्य रस्त्यावरून दिघी पोर्ट ची अवजड वाहतूक रोजच होत असते परंतु हा रस्ता सुस्थितीत करण्याच्या कामाकडे दिघी पोर्ट व्यवस्थापन दुर्लक्ष करीत आहे. तसेच माणगाव ते दिघी बायपास रस्त्याचे काम सुरू असून हा रस्ता खारगाव खुर्द (सकलप) या गावाला वळसा देऊन पुढे दिघी पोर्टला जोडणारा मुख्य सिमेंट काँक्रीटचा पक्का रस्ता तयार करण्याचे काम जे.एम.म्हात्रे कन्ट्रक्शन करीत असून सध्या या म्हात्रे कन्ट्रक्शन च्या मालवाहतूक अवजड गाड्यांची वाहतूक देखील म्हसळा शहरातील याच मुख्य रस्त्यावरून होत आहे. या रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करणारे जे.एम.म्हात्रे कन्ट्रक्शन देखील या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत. नागरिकांच्या हिताच्या व सोयीच्या दृष्टीने जे.एम.म्हात्रे व दिघी पोर्ट यांनी समन्वय साधून तसेच तालुक्यातील संबंधित अधिकारी वर्गाने लक्ष घालून लवकरात लवकर दिघी नाका पासून ते तोंडसुरे गावापर्यंतच्या मुख्य रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.


 "म्हसळा शहर दिघी नाका पासून ते तोंडसुरे गावापर्यंत मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली आहे. आमच्या भागातील नागरिक रोज या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करून वैतागले आहेत. तसेच आम्ही रिक्षा चालक जीवावर उदार होऊन या मार्गावर रिक्षा चालवीत आहोत. शासनाचे अधिकारी या रस्त्यावर एखादा मोठा अपघात होण्याची वाट बघत आहेत का असा आमचा सवाल आहे ?. संबंधित विभागाने या रस्त्याचे डागडुजीचे काम लवकरात लवकर सुरू करावे अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून जनआंदोलन करावे लागेल."
श्री.प्रकाश गाणेकर, सामाजिक कार्यकर्ते व रिक्षाचालक आगरवाडा

दिघी नाका पासून तोंडसुरे पर्यत रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून मोठमोठे खड्डे पडले असल्याने हा रस्ता खड्ड्यात गेला आहे अशी वस्तुस्थिती पहायला मिळत असून दिघी पोर्ट व तालुक्यातील संधीत अधिकारी वर्ग आमच्या भागातील जनतेच्या शांत व संयमी पणाचा फायदा घेत आहे. हा रस्ता कधी होईल असा प्रश्न निर्माण झाला असून या रस्त्याला कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न पडला आहे. रस्ता लवकरात लवकर दुरुस्त व्हावा ही मागणी आहे."
श्री.गजानन जंगमरिक्षाचालक जंगमवाडी

 म्हसळा शहर ते दिघी नाका पासून तोंडसुरे गावापर्यत रस्ता खूप खराब झाला असून याची कल्पना आहे. येत्या चार दिवसांत या रस्त्यावरील खड्डे व्यवस्थितरित्या भरून रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत केला जाईल याची मी स्वतः खबरदारी घेणार आहे.
श्री.सचिन निफाडे, एक्सिकेटीव्ह इंजिनियर, नॅशनल हायवे ( माणगाव -दिघी रस्ता)

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा