बायोमेट्रिक विना धान्य वाटपाची परवानगी द्यारायगड धान्य विक्रेत्यांची मागणी



किरण काशिराम शिंदे/ लोणेरे

रायगड जिल्ह्यात सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्वस्त धान्य दुकानदारांचे आधार  अधिप्रमाणित करून धान्य वाटप पूर्ववत ठेवावे, बायोमेट्रिक नोंदीची सक्ती नको, अशी मागणी अंबड  स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत स्वस्त धान्य दुकानावर ग्रामस्थ गर्दी करतात, नियमांचे पालन होत नाही अशा वेळेस बायोमेट्रिक प्रणालीद्वारे धान्य वाटप केल्यास कोरोना संक्रमित ग्रामस्थांमधून इतरांना संक्रमण होण्याची भीती नाकारता येत नाही. कोरोनामुळे ऑपरेटर व कर्मचारी कामावर येत नसल्याने मोठी अडचण होत आहे. प्रशासनाने रास्त भाव दुकानदार यांचा थंब अधिप्रमाणित करून कार्डधारकांना धान्य देण्याची सुविधा यापुढेही जोपर्यंत कोरोना परिस्थिती आहे तोपर्यंत कायम ठेवावी तसेच थर्मलगन व सॅनिटायझर उपलब्ध करून दयावे, अशी मागणी केली आहे.
यावेळी रायगड जिल्ह्यातील रेशन दुकानदारांची करोना टेस्ट करण्याचा जिल्हाधिकारी यांचा निर्णय स्वगताहार्त असून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, सोशियल डिस्टन्सिंग राखण्यासाठी, ग्राहक व दुकानदार यांचा योग्य समतोल राखण्यासाठी पुढील काही महिने बायोमेट्रीक विना धान्य वाटप करण्यासाठी परवानगी द्यावी अशी माहिती रायगड जिल्हा धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा