संतोष सपाते : श्रीवर्धन
श्रीवर्धन तालुक्यात कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी रायगड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश माने यांनी आज श्रीवर्धन दौरा केला. उपजिल्हा रुग्णालयातील मध्यवर्ती ऑक्सिजन केंद्राची पाहणी करण्यात आली. तसेच रुग्णालयातील रिक्त पदाविषयी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी माहिती घेतली. श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात आजमितीस वैद्यकीय अधिकारी 2, कक्ष सेवक 2, शिपाई दोन, औषध निर्माण अधिकारी 2, सफाई कामगार एक असे विविध पदे रिक्त आहेत. 2004 मध्ये उपजिल्हा रुग्णालय ची वास्तू बांधण्यात आली आहे.उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा कणा आहे. चार जुलै 2020 रोजी रोहा येथे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक प्रमोद गवई, पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या बैठकीत रायगड जिल्ह्यातील विविध भागात रुग्णवाहिका उपलब्ध करण्याविषयी चर्चा झाली त्यानुसार 19 जुलै 2020 ला श्रीवर्धनमध्ये दोन रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. डॉक्टर सतीश माने यांच्याशी संवाद साधला असता जिल्हा रुग्णालयात रिक्त पदे भरण्याविषयी कार्यवाही केली जाईल असे सांगण्यात आले. तसेच उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत. आठवड्यातील एक दिवस गर्भवती महिलांसाठी सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्यासाठी संबंधित तज्ञ डॉक्टर्स माणगाव येथून श्रीवर्धनला पाठवले जाणार आहेत असे डॉक्टर सतीश माने यांनी सांगितले. श्रीवर्धन प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी अमित शेडगे, शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश माने, वैद्यकीय अधिकारी महेंद्र भरणे, मयूर हडगे मोहम्मद अली यांच्यात श्रीवर्धन म्हसळा तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रण या विषयावर चर्चा झाली आहे.
श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात सर्व सोई सुविधा पुरवल्या जातील . गर्भवती स्त्रियांसाठी सोनोग्राफी सुविधा उपलब्ध केली जाईल. कोरोना पार्श्वभूमीवर आजचा दौरा आयोजित केला आहे. आरोग्य प्रशासन दर्जेदार सेवा देण्यासाठी सज्ज आहे..... सतीश माने (जिल्हा शल्यचिकित्सक रायगड )
सुनील तटकरें साहेबांनी रुग्णवाहिकेचा प्रश्न मार्गी लावला आहे. उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठी आरोग्य मंत्र्यांशी तात्काळ संवाद साधला जाईल . मी श्रीवर्धन म्हसळा तालुक्यातील आरोग्याच्या प्रश्ना विषयी सजग आहे. आरोग्य विषयक बाबींचा तात्काळ पाठपुरवठा करण्यात येत आहे..... अनिकेत तटकरें (विधानपरिषद आमदार )
उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य विषयक सेवा सुविधांच्या त्रुटी विषयी रायगड जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी संवाद साधून सदर बाबी त्यांच्या निदर्शनास आणूना दिल्या आहेत.... दर्शन विचारे (राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष श्रीवर्धन )
Post a Comment