लॉकडाउन काळात दूध विक्री, किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन, मटण, अंडी,मासे विक्री दुकाने स.6 ते दु. 2 पर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी
( म्हसळा प्रतिनिधी):- जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी लॉकडाउनच्या काळात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात दूध विक्री दुकाने, किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन, मटण, अंडी, मासे विक्री दुकाने/आस्थापना सकाळी 6.00 ते सकाळी 11.00 या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती.
मात्र आता मूळ लॉकडाऊन आदेशात सुधारणा करुन रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात दूध विक्री दुकाने, किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन, मटण, अंडी, मासे इ. दुकाने/आस्थापना यापुढे सकाळी 6.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मान्यता दिली आहे.
तसेच समुद्रकिनारी, सार्वजानिक/खाजगी क्रिडांगणे, सोसायटी/संस्था यांच्या अखत्यारीतील मैदाने, उद्याने इत्यादी सह जवळच्या सार्वजानिक खुल्या जागेत वैयक्तिक स्वरुपात शारीरिक व्यायाम उदा. सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, वॉकिंग हे व्यायाम याेग्य शारिरीक अंतर (Physical distance) ठेवून सकाळी 5.00 ते सायं. 8.00 या वेळेतील ठराविक कालावधीसाठी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी शारिरीक व्यायामाव्यतिरिक्त अन्य कोणतीही बाब/सामूहिक गतीविधी करण्यास परवानगी नाही. नागरिकांनी शक्यतो शारिरीक व्यायामासाठी सायकलिंग या पर्यायाचा जास्तीत जास्त वापर करावा जेणेकरुन शारिरीक अंतर (Physical distance) राखण्यास मदत होईल, असेही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
Post a Comment