समुद्राच्या उधाणाने गिळली यशवंती खारशेती ; "टाळेबंदी" आणि "निसर्ग" प्रकोपानंतर बळीराजाला खाऱ्या पाण्याचा विळखा
मकरंद जाधव-बोर्लीपंचतन
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन दिवेआगर व शिस्ते या गावाच्या मध्ये असणाऱ्या यशवंती खार मधील सुमारे ३५० हेक्टर भातशेतीत समुद्राच्या उधाणाचे पाणी शिरल्याने या परीसरातील शेती पाण्याखाली गेल्याने नापीक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे खाडीचे पाणी शेतीत घुसु नये यासाठी खारभुमी विभागाकडुन दिवेआगर जवळील खाडीच्या मुखाजवळ सातउघडी येथे स्वयंचलीत दरवाजे लावण्यात आले आहेत भरती ओहटीच्या वेळी समुद्रातचे पाणी शेतामध्ये घुसण्यापासुन बचाव करण्यासाठी त्याचा उपयोग होतो पण काही महीन्यांपासुन त्यातील काही दरवाजे तुटल्याने सुमारे ३५० हेक्टर भात शेतीमध्ये समुद्राच्या उधाणाचे पाणी घुसुन या हंगामात लावलेले भात बियाणे वाया गेले असुन या परीसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.कोरोना महामारीमुळे ठप्प झालेला रोजगार यातुन सावरत शेतकरी शेतीकामात व्यस्त झाला होता.या पावसाळी हंगामाचे भात बियाणे पेरुन पावसाची वाट पाहत असताना ३ जुन रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने सर्वांचे कंबरडे मोडले.त्यातच शेतीमध्ये समुद्राच्या उधाणाचे खारे पाणी शिरल्याने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन पेरलेले भात बियाणे वाया गेल्याने यावर्षीचा भातपीकाचा हंगाम हातुन गेल्यातच जमा आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.या परिसरात बोर्लीपंचतन,दिवेआगर,शिस्ते,
कापोली,या गावातील शेकडो शेतकऱ्यांची सुमारे ३५० हेक्टर खारशेती असुन या भातशेतीत शिरलेल्या उधाणाच्या पाण्याने शेती नापीक होण्याची शक्यता निर्माण झाली असुन यावर्षी या भात शेतीतून पिक घेता येणार नसल्याने शेतकर्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये गुरांच्या वैरणीचा प्रश्नसुध्दा शेतकऱ्यांसमोर उभा ठाकणार आहे. यामुळे सातउघडीच्या दरवाजांचे काम त्वरीत करुन भातशेतीत घुसणाऱ्या उधाणाच्या पाण्याने उध्वस्त होण्यापासुन "आमची यशवंती खार वाचवा" अशी मारत असलेली आर्त हाक संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यत पोहचेल का ? अशा आपल्या संतप्त भावना हतबल झालेले शेतकरी व्यक्त करीत आहेत.
दोन वर्षापुर्वीच या झडपांच्या दुरुस्तीचे काम केले असुन आत्ताची झालेली दुरावस्था बघता त्याबाबतचा जिल्ह्यातील सर्व खारशेतीबद्दलचा दुरुस्तीचा अहवाल वरीष्ठांमार्फत शासनाकडे पाठविला असुन शासनाच्या ४ मे च्या आधिसुचनेनुसार यावर्षीच्या ६७ टक्के निधी कपातीमुळे यासाठी सध्या कोणताही निधी उपलब्ध नसल्याने सदरचे काम प्रलंबित असुन निधी उपलब्ध होताच दरवाज्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरु करण्यात येइल.तरीसुध्दा वैयक्तिक स्तरावर जिल्ह्याच्या पालकमंत्री व खासदार तसेच संबधित वरीष्ठ आधिकारी यांच्याजवळ पाठपुरावा करुन शक्य तितक्या लवकर ही समस्या सोडविण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे.
-सोनल गायकवाड (कार्यकारी आभियंता खारभुमी विकास विभाग पेण)
काही विघ्नसंतोषी घटकांकडुन सातउघडी वरील स्वयंचलीत दरवाजांना जाणिवपुर्वक हानी पोहचविण्याचे काम होत आहे. त्यामुळे आमची भातशेती उध्वस्त होत आहे.
-कृष्णकांत जनार्दन पाटील, शेतकरी बोर्लीपंचतन
Post a Comment