मकरंद जाधव-बोर्लीपंचतन
भारताच्या आर्थिक राजधानीचं शहर असलेल्या मुंबई नगरीमध्ये कोरोनाच्या महाभयानक संसर्गाने सर्वांचीच झोप उडवली आहे.सहाजीकच नोकरी व्यवसायासाठी कोकणातून मुंबईत आलेल्या चाकरमान्यांना गावाकडच्या आपल्या घराची व कुटुंबाची ओढ लागली आहे.चाळ संस्कृतीतल्या छोट्या खोलीत चाकरमान्यांना आपल्या कुटुंबासह राहणे आत्ताच्या धोकादायक परीस्थितीत अशक्य झाले आहे.अनेक ठिकाणी शौचालयसुद्धा सार्वजनिक असल्याने संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे.त्यामुळे अनेक चाकरमान्यांचे इथून सुटकेसाठी प्रयत्न सुरु आहेत.या ओढीतूनच मग मिळेल त्या मार्गाचा अवलंब करुन प्रत्येकजण काहीही करुन आपलं घर जवळ करत आहे.गावी आल्यावर आपल्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये याचे गांभीर्य असलेले काहीजण कर्तव्यभावनेतून कमालीची दक्षता बाळगत आहेत तर कित्येकजण जत्रेमधे फिरायला आल्यासारखे खुलेआम फिरत आहेत.याच दरम्यान श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन गावातील नोकरीसाठी मुंबईस्थीत असलेला विजय वसंत पयेर आपल्या पत्नी व छोट्या मुलासह गावाला येणार म्हणून शेतकरी कुटुंबातील त्याचे वडील वसंत केशव पयेर यांनी कर्तव्यभावना सर्वोच्च मानून आपल्या मुलाच्या कुटुंबामुळे शेजाऱ्यांना व पर्यायाने आपल्या गावाला कोणताही त्रास होऊ नये म्हणुन आपल्या पत्नीसह एक महीन्यासाठी बोर्लीपंचतन गावातच भाड्याच्या खोलीत रहाण्याचा निर्णय घेऊन आपलं रहातं घर मुंबईहून येणाऱ्या आपला मुलगा,सून आणि नातवंडाच्या विलगीकरण काळासाठी राहण्यास मोकळं करुन दिलं.वसंत पयेर यांच्या या कर्तव्यभावनेचं सर्वत्र कौतुक होत आहे.मात्र याचं कोणतही गांभीर्य नसलेली मुंबंई व इतर शहरातुन गावाकडे आल्यावर आपल्या कुटुंबाचा व गावाचा कोणताही विचार न करता खुलेआम फिरणाऱ्या लोकांनी या घटनेचा आदर्श घेऊन आरोग्य विभागाने दिलेल्या सुचनांनुसार सामुहीक जबाबदारीचे पालन केले तर कोरोनाला हरवणे आपल्याला सोपे होणार आहे.भीती असली तरी काळजी घेणे हा सध्यातरी सर्वोत्तम उपाय मानला जात आहे.त्यामुळे प्रत्येकानेच प्रतिसाद देऊन आपले कर्तव्य पार पाडावे असे आवाहन तालुका प्रशासनाकडुन नागरीकांना करण्यात येत आहे.
Post a Comment