शिवभोजन केंद्राना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांची भेट
प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये, यासाठी शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून दररोज सकाळी 11 ते 3 या वेळेत केवळ पाच रुपयांत शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात येत आहे.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज जिल्ह्यातील रोहा येथील साई भोजनालय, तळा येथील शिवभोजन थाळी केंद्र व माणगाव येथील साई सुविधा भोजनकेंद्रावर भेट दिली. करोना विषाणू प्रादूर्भावामुळे ज्या लोकांना स्वत:च्या जेवणाची सोय करू शकत नाही अशा लोकांनासुद्धा या शिवभोजन योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच येणाऱ्या गरजूंना पार्सल देण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावरील बेघर, स्थलांतरीत किंवा अन्य कोणीही उपाशी राहणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. केंद्रचालकांनीही स्वच्छतेचे भान बाळगावे व चांगल्या दर्जाचे जेवण गरजूंना उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.
नागरिकांनीही प्रशासनाने सांगितलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, कोणत्याही परिस्थितीत गर्दी टाळावी, सोशल डिस्टसिंग पाळावे, स्वच्छता ठेवावी, असे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी यावेळी नागरिकांना आवाहन केले.
Post a Comment