रायगड (गुरुदत्त वाकदेकर)
दिवसें दिवस करोनाचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. सगळीकडे अगदी भय आणि चिंतेचे वातावरण आहे. प्रशासन, अत्यावश्यक सेवा देणारे झटताना दिसत असताना लॉकडाऊनच्या सुरूवातीला सगळ्यांच्या मनातील भय व भीती दूर व्हावी, एक सकारत्मता पसरावी ह्या हेतूने सर्व साहित्यिकांनी हातभार लावण्याचे आव्हान साहित्यसंपदा समूहाकडून करण्यात आले होते. त्याला अनुसरून साहित्यसंपदा समूहातर्फे विविध ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते.
आपल्यातील साहित्यप्रतिभेला वाव मिळावा, आपल्या लिखाणातून सकारात्मक विचारांचे बीज पेरले जाण्यासोबत भेदरलेल्या मनाला सक्षम करण्याचे काम ह्या निमित्ताने करण्यात आले. उपलब्ध वेळेचा पुरेपूर वापर करून मराठी भाषा संवर्धन प्रचार आणि प्रसार तसेच मराठी साहित्य विश्वाची ओळख तरुण पिढीला करून देणे, आंतरिक कलागुणांना वाव मिळवून देणे, सामाजिक बांधिलकी जोपासणे अशी काही उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून सर्व स्पर्धांची रचना प्रशासकीय समूहातर्फे करण्यात आली होती. २१ दिवसांत निरनिराळ्या २१ स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील विविध भागातील साहित्यिकांचा सहभाग लक्षणीय ठरला. कथा अभिवाचन स्पर्धेत पुण्यातील आरुषी दाते ह्यांनी बाजी मारली तर गझल लेखनात नाशिक दोऱ्हाळे येथील शिवाजी चौधरी ह्यांनी आपल्या गझलेने मने जिंकली. पुस्तक परीक्षण स्पर्धेत नांदेड येथील डॉ. शिवकुमार पवार तर भक्ती गीत लेखनात नमिता जोशी ह्यांनी नंबर पटकावले. अति लघु कथा लेखन आणि सादरीकरण मध्ये मुंबई मधील अपेक्षा बिडकर तर कोल्हापूर मधील स्मित शिवदास ह्यांनीं पाककृती लिखाण स्पर्धेत आपले कौशल्य सिद्ध केले. काव्य रसग्रहण, ओव्या लेखन, नाट्यछटा लेखन तसेच शीघ्र चारोळी जुगलबंदी ह्या स्पर्धां मधील स्पर्धकांचा सहभाग आयोजकांचा उत्साह वाढविणारा होता. साहित्यक्षेत्राशी निगडित "कोण बनणार साहित्य मंत्री " ह्या प्रश्न मंजुषेत स्पर्धकांनी आपल्या कुटुंबियांना सुद्धा सहभागी करून येणाऱ्या पिढयांमध्ये मराठी साहित्याची गोडी निर्माण केली. वैशाली कदम, प्रतीक धनावडे आणि रसिका लोके ह्यांनी "साहित्यसंपदा डिजिटल पर्व " ह्या youtoube चॅनेल वर काव्यवाचन, एकपात्री आणि हास्यरस सादरीकरण असे विविध उपक्रम राबवले. लोकांमध्ये परिस्थितीशी लढण्यासाठी आत्मविश्वास निर्माण व्हावा ह्यासाठी "मीच माझा रक्षक" ह्या शिर्षकाअंतर्गत विविध स्तरातील आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या कवितांमधून समाजाला मार्गदर्शन केले.
ज्येष्ठ साहित्यिक आणि गझलकार ह्यांचे व्यक्तिचित्रण रवींद्र सोनावणे ह्यांनी आपल्या कवितेतून मांडून ज्येष्ठ साहित्यिक माननीय गझलकार अे. के. शेख ह्यांचे व्यक्तिमत्व प्रभावीपणे मांडले. सदर विविध स्पर्धा नक्कीच आत्मविश्वास वाढवणाऱ्या आणि समाजात एक संदेश देणाऱ्या होत्या असे मत नाशिक मधून सहभागी नीता आंधळे आणि सोलापूर मधील सामाजिक कार्यकर्ते कैलास नाईक ह्यांनी मांडले. करोनामुळे मदत न मिळू शकणाऱ्या बालग्रामास आणि धनगरवाडीस समूहातील जीविता पाटील ह्यांच्या पुढाकारातून सुद्धा मदत करण्यात आली. समाजाला मदत करण्यासाठी पुढे सरसावलेल्या सर्व व्यक्तींचे समूह संस्थापक वैभव धनावडे ह्यांनी व्यक्तिगत आभार मानले. संपूर्ण उपक्रम हा ऑनलाईन असल्याने तांत्रिकबाबी सांभाळणे आवाहनात्मक होते पण ही धुरा मनोमय मिडियाने लीलया सांभाळली. रायगडमधील जेष्ठ साहित्यिक पत्रकार रमेश धनावडे ह्यांनी साहित्यसंपदा समूहाचे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
साहित्य सेवेच्या माध्यमातून समाजभान राखणाऱ्या आणि लॉकडाऊन काळात लोकांनी घराबाहेर निघू नये म्हणून स्पर्धांच्या रूपाने त्यांना मराठी जगताची सफर घडवणाऱ्या साहित्यसंपदा समूहाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
Post a Comment