नविद अंतुले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. बॅ. ए.आर. अंतुले यांचे सुपूत्र नविद अंतुले यांचे मंगळवारी (28 एप्रिल) रात्री हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबईतील सैफी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.
मंगळवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. वडील बॅ. ए.आर. अंतुले राजकारणात सक्रीय असताना नविद अंतुले हे राजकारणापासून दूर होते. दोन वर्षांपूर्वी आंबेत ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते सक्रीय झाले. स्थानिक जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता.


बोलायला रोखठोक असलेले नविद तरुणांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत मार्च 2019 मध्ये नविद अंतुले यांनी काँग्रेस ऐवजी थेट शिवसेनेत प्रवेश करून सर्वांनाच धक्का दिला होता. मात्र त्यांची राजकीय कारकीर्द अल्पायुषी ठरली. मंगळवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यांची प्राणज्योत मालवली. बॅ. अंतुले यांचे गाव असलेल्या म्हसळ्यातील आंबेतमध्ये नविद अंतुले यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या निधनाच्या या वृत्ताने आंबेतसह रायगडवासियांना मोठा धक्का बसला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा