म्हसळ्यात ग्राम पंचायत स्तरावर "करोना संसर्ग नियंत्रण कक्ष व पथकाची स्थापना"


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी 
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून, आरोग्य विभाग या संसर्ग थांबवण्यासाठी नानाविध प्रयत्न करीत आहे़ सुरुवातीला पुणे आणि मुंबई अशा मोठ्या शहरांमध्येच कोरोनाबाधीत रुग्ण आढळले़ त्यानंतर ते राज्यातील इतर मोठ्या शहरातही आढळू लागले़ त्यामुळे राज्यभरात संचारबंदी आणि जिल्ह्या-जिल्ह्यामध्ये सिमाबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला़ या निर्णयानंतर पुणे, मुंबईसह मोठ्या शहरात शिक्षण आणि रोजगारासाठी स्थलांतरित झालेले नागरिकांचे लोंढे गावाकडे परतू लागले़ या नागरिकांच्या माध्यमातून कोरोनाचाही शिरकाव होवू नये, याची खबरदारी घेतली जात आहे़ याच पार्श्वभूमीवर "करोना संसर्ग नियंत्रण पथकाची स्थापना" ग्रामपंचायत पातळीवर करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दि.२२ मार्चला दिले आहेत. त्याची तालुक्यात अमल बजावणी सुरवात झाली आहे. तालुक्याचे नोडल ऑफीसर म्हणून गटविकास अधिकारी व शहराचे नोडल ऑफीसर म्हणून नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी यांची जिल्हाधिकारी यानी नेमणूक केली आहे.
तालुक्यातील एक नगरपंचायत व ३९ ग्रामपंचायती मध्ये मोठ्या शहरांमधून आलेल्या नागरिकांमध्ये काही लक्षणे आढळत तर नाहीत ना याचा शोध या सर्वेक्षणातून घेतला जाणार आहे़ .त्यातूनच आशा सेविकांना तक्त्यांचा एक अर्ज देण्यात आला असून, त्यात माहिती भरून घेतली जात आहे़ जिल्ह्यात हे काम २२ मार्चपासून सुरू करण्यात आले़ या सर्वेक्षणामुळे परदेशातून किती नागरिक आले?नागरिकांना कोणता आजार आहे? श्वसन विकाराचे लक्षण? आदी माहिती संकलित होणार आहे़.Home Qurantine शिक्का मारला आहे का? परजिल्ह्यातून किती नागरिक दाखल झाले? अलगी करणा बाबत माहीती, या माहितीच्या आधारे आरोग्य यंत्रणेला आता उपचार करणे सोयीचे होणार आहे़ .
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी संचार बंदी लागू करण्यात आली आहे. या संचार बंदीच्या कालावधीत ग्रामीण भागात जीवनाश्यक सेवा सुरळीत रहावी. गावातील गरजा गावांत भागविल्या जाव्यात तसेच परदेशाहून व परजिल्ह्या तून आलेल्या नागरीकांना वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी ग्राम समितीमार्फत व्यवस्था केली जाणार आहे. गाव कोरोनामुक्त राहण्यासाठी ग्रामसमिती सुरक्षा कवच रहाणार असल्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शरद गोसावी यांनी सांगितले.
संचार बंदीच्या कालावधीत शहरी व ग्रामीण भागातील जीवनावश्यक वस्तुचा पुरवठा सुरळीत रहावा 
यासाठी जीवनावश्यक वस्तूचा काळाबाजार व साठेबाजार होणार नाही यांची दक्षता घ्यावी अशा सूचना तहसीलदार गोसावी व म्हसळा पोलीस स्टेशनचे स.पो.नी. धनंजय पोरे यानी ग्रामस्तरीय समितीला दिल्या आहेत. ग्रामस्तरीय समीती मध्ये तलाठी, मुख्याध्यापक,ग्रामसेवक,आरोग्य सेवक, सर्व संबधीत शिक्षक,आशा वर्कर, ग्रामस्तरावरील सर्व विभागाचे अधिकारी, अंगणवाडी सेवीका, मदतनीस,पोलीस पाटील, स्थानिक पोलीस यांचा समावेश रहाणार आहे.तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये करोना संसर्ग नियंत्रण कक्ष व पथकाची स्थापना झाली असल्याचे ग.वि.अ. प्रभे यानी सांगितले, नगरपंचायतीने या बाबत अद्यापही कोणतीही माहीती कळविली नसल्याचे नायब तहसीलदार के.टी.भिंगारे यानी सांगितले.
" म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागात ३९ ग्रामपंचायतीमधीत ५०२३५ लोकसंखेसाठी नोडल ऑफीसर म्हणून गटविकास अधिकारी व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील ९६७६ लोकसंखे- साठी नोडल ऑफीसर म्हणून नगर .पंचायतीचे मुख्याधिकारी काम पहाणार आहेत. दर सोमवारी ग्रामपातळीवरील माहीती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे"

फोटो : तालुक्यातील आंबेत ग्रामपंचायतमध्ये करोना संसर्ग नियंत्रण पथकाची स्थापना करण्यात आली.
छायाचित्रांत तलाठी जितेंद्र शेळके, मुख्याध्यापक मंगेश साळवी, आ.सेविका वैशाली मोरे, अं.सेविका सुनंदा सावंत व अन्य

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा