अलिबाग: करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि. 14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या दरम्यान नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी विविध नियम व उपाययोजना जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी लागू केले आहेत.
दि.24 मार्च 2020 रोजी मध्यरात्री पासून दि.14 एप्रिल 2020 पर्यंत संपूर्ण देशात 21 दिवस संचारबंदी (लॉकडाऊन) लागू करण्याचे मा.प्रधानमंत्री महोदयांनी घोषित केले आहे. तथापि या कालावधीत अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व स्वच्छता कर्मचारी यांच्या सेवा सुरु राहणे आवश्यक आहे.
या आदेशान्वये आता दि.31 मार्च 2020 पासून पुढील आदेश होईपर्यंत शासकीय,निमशासकीय,बँक, पोलीस, डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी इत्यादी अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची दुचाकी वाहने, मेडिकल, पॅरामेडिकल, पॅथॉलॉजी इत्यादी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तींची दुचाकी वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या उदा.दवाखाना, गॅस सिलेंडर, बँक व्यवहार, वृत्तपत्र वाटप करणे, पत्रकार, सुरक्षा रक्षक यांची दुचाकी वाहने, कोविड-19 चा प्रतिबंध करण्यासाठी काम करणाऱ्या खाजगी व्यक्तींची दुचाकी वाहने, शासकीय कार्यालयामार्फत परवानगी दिलेल्या व्यक्तींची दुचाकी वाहने या व्यतिरिक्त इतर कोणत्याही दुचाकी वाहनांना नागरी भागामध्ये पेट्रोल देण्यास मनाई करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी पारित केले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित पेट्रोल पंपधारकाविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत व प्रतिबंधक कायदा 1897 मधील कलमांतर्गत तसेच भारतीय दंड संहिता 1960 च्या कलम 188 अंतर्गत व इतर अनुषंगिक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे.
Post a Comment