संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. पण, त्यानंतर देखील रस्त्यावर वाहनांची रहदारी कमी झाली नाही.परिणामी आता रायगड जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण क्षेत्रात आजपासून अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त वाहनांना बंदी करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्यांना यातून मुभा आहे. तर अतिमहत्त्वाच्या कामासाठी नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने पास दिले जाणार आहेत. त्यासाठी covid19.mhpolice.in या वेबसाईटवर नागरिकांना संबंधित तपशील भरावयाचा आहे. याची माहिती म्हसळा पोलीस स्टेशनचे सपोनी धनंजय पोरे यानी दिली. पास मिळवायला होणारी गर्दी आणि अनावश्यक प्रवास टाळण्या- साठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस ऑनलाइन सेवा देणार आहे.कोरोना संक्रमणाची भीती असताना अत्यावश्यक सेवांसाठी जिल्हा प्रशासनाकडून पास देण्यात येत होते.या पासद्वारे आत्यावश्यक सेवेच्या मालाची वाहने, मेडिकल सेवेतील व्यक्तीसह अनेकजणांना बंदीच्या काळातही प्रवास करता येत होता.मात्र, हे पास काढण्यासाठी तहसीलदार कार्यालयांवर गर्दी होऊ लागली आणि यामुळे धोकाही वाढला. या पार्श्वभूमी वर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस दलाने एकत्र येऊन ऑनलाइन सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी http:// covid19.mhpolice.in या लिंकवर क्लिक करा आणि त्याद्वारे आवश्यक माहिती भरून दिल्या नंतर QR code उपलब्ध करून दिला जाणार आहे. हा code दाखवल्यानंतर वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी देण्यात येणार आहे. यामध्ये एकाही कागदाची, प्रत्यक्ष येऊन भेटण्याची गरज लागणार नाही, केवळ हा पास अत्यावश्यक सेवेसाठी लागू होईल, हे ही पोरे यांनी स्पष्ट केले आहे. त्याशिवाय तालुक्यात किराणा मालासाठी घरपोच सेवा सुरू करण्यात आली असून लोकांची बाहेर पडण्याची कारणे कमी झालीआहेत असे पोरे यानी सांगितले या कोरोनाचा सामना करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आपण आलो असून लोकांनी घरीच राहावे, असे आवाहन सपोनी धनंजय पोरे यांनी केले आहे.
बंदी हुकूम मोडल्याने म्हसळयात गुन्ह्याची नोंद
"अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त वाहनांना बंदी करण्यात आली आसतानाही पोलादपूर वरुन श्रीवर्धनकडे तंबाखू घेऊन जाणाऱ्या MH/06/BW 918 या पिकअपवर जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस देवीदास चंद्रभान कारखेले यानी गुन्हा रजी ९/ २०२० भा.द.वी.१८८/२७१. कोविड १९/ उपाय योजना नियम २०२० नियम ११ प्रमाणे मा. जिल्हाधि- कारी, रायगड यांचे आदेशाचे अवमान केल्यामुळे गुन्हा नोंदविला आहे"
Post a Comment