लोककवी स्व.अनंत_पाटील यांचा आज_१०_वा_स्मृतिदिन.

प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
  स्व.गायक प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली ८०% गाणी ज्यांनी शब्दबद्ध केली ते स्व.अनंत पाटील यांचा आज १० वा स्मृतिदिन.महाराष्ट्राच्या तळागाळातील जनमानसातील हा महानायक आपल्या आयुष्यातील अखेरपर्यंत प्रसिद्धीलोलुप राहिला.
    महाराष्ट्रात श्री सत्यनारायण महापूजेच्या वेळी आवर्जून लागणारे गाणे म्हणजे ' श्री हरी जगदपिता दुर करी तो व्यथा,ऐका सत्यनारायणाची कथा '. प्रल्हाद शिंदेंना लाभलेल्या स्वर्गीय गोड गळ्यातून स्वरबद्ध झालेलं हे गीत अजूनही महाराष्ट्राच्या सान-थोर मंडळींना भक्तीभावात लीन करतं.
     'जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतोरे ईश्वर' हे जीवनाचे सार आणि मर्म सांगणारे भावगीत असू दे की विठ्ठल चरणी निर्माण झालेली  ' पाऊले चालती पंढरीची वाट','चल ग सखे पंढरीला', ' नाम तुझे घेता देवा होई समाधान', ' गेला हरी कुण्या गावा', 'दिंडी चालली', 'दर्शन देरे देरे भगवंता', 'चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी,तो पहा विटेवरी.' असे विठ्ठल भक्तांना भक्तिरसात दंग करणारे अभंग - गाण्यांच्या रचनांचे शिल्पकार.
    गणपती बाप्पाचे 'तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता अवघ्या दिनांच्या नाथा', 'आता तरी देवा मला पावशील का,सुख ज्याला म्हणतात ते दावशील का..' हे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर  बाप्पाला केलेलं आर्जव मराठी मनाला आजही गुणगुणायला लावतं.
     'चिंबोरी हानलिन बारांची', 'आगीनगारी बोलतेय बेगिनगारी', 'आम्ही कोली दर्याचे राज हाव', 'हातानं भरल्यान हिरवा बांगऱ्या', 'आज कोलीवाऱ्यात येईल वरात', 'एकवीरा आई माझी सत्वाची' यासारखी अखिल मराठी मनावर गारुड करणारी कोळीगीत असू दे अशा सर्वच ठिकाणी त्यांनी आपल्या प्रतिभेने सर्वांना आपलेसे केले होते.
    त्याचप्रमाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने प्रेरित होऊन लिहिलेली शेकडो भीमगीते असू दे की शिवसेना या पक्षासाठी लिलिलेलं 'ताई माई अक्का विचार करा पक्का आणि धनुष्य बाणावर मारा शिक्का' हे स्फूर्तीगीत असो सर्वच क्षेत्रात अगदी मुक्त संचार.स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी तर या शिवसेना गीतासाठी मातोश्रीवर बोलावून केलेला त्यांचा आदर सत्कार त्यांना खूप भावला.
   ' अनंताची अभंगगीते','कोळीगीते - लग्नगीते' अशी एकूण ३२ शिर्षकाची विविध पुस्तके प्रकाशित झाली आहेत.तत्कालीन टी सिरीज,एच.एम. व्हि., कुणाल यासारख्या प्रख्यात ध्वनी मुद्रण कंपन्यांनी केलेली त्यांच्या गाण्यांची  रेकॉर्डस् मराठी मनावर अजूनही अधिराज्य गाजवीत आहेत.
   स्व.प्रल्हाद शिंदेंच्या बरोबरच विठ्ठल उमप,मधुकर पाठक, सुदेश भोसले, आनंद शिंदे,मिलिंद शिंदे,उत्तरा केळकर,रंजना शिंदे,राणी रुपलता आदी जुन्या गायकांबरोबरच नव्या पिढीतील कविता कृष्णमुर्ती,स्वप्नील बांदोडकर,वैशाली सामंत,बेला शेंडे अशा सर्वच दिग्गज गायकांनी त्यांची गीते स्वरबद्ध केली आहेत.
    असा हा अवलिया आगरी - कोळी साहित्यावर अधिकाराने बोलणारा जाणकार.सामाजिक प्रश्नांवर आपल्या साहित्यातून- गीतांमधून उपहासात्मक टिका करुन आवाज उठवणारा हा सर्वसामान्यांचा 'अनंत' थोड्याशा आजाराचे निमित्त होऊन २६ मार्च २०१० रोजी कायमचा अनंतात विलीन झाला..
    मरणोत्तर तरी महाराष्ट्र शासनाने या कलाकाराची शासन दरबारी दखल घ्यावी आणि शालेय पाठ्यपुस्तकात त्यांचे लोक साहित्य प्रकाशित करावे हीच त्यांच्या कुटुंबियांकडून माफक अपेक्षा.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा