अंनिस म्हसळा शाखेच्या वतीने "छत्रपती शिवाजी महाराज" अभिवादन स्पर्धा संपन्न

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार बालवयातच मनावर बिंबवले पाहिजेत - चेअरमन समीर बनकर

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

   हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातींच्या लोकांना सोबत घेऊन रयतेचे स्वराज्य स्थापन केले. मोघल शाही व इतर बादशहांकडून त्याकाळात स्त्रियांवर होणारे जुलमी अन्याय, अत्याचार थांबवून स्त्रियांना सन्मानाने जगायला शिकवले तसेच रयतेचा राजा म्हणून नावलौकिक मिळविलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार बालवयातच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले पाहिजेत असे महत्वपूर्ण प्रतिपादन न्यु इंग्लिश अँड ज्युनिअर कॉलेज म्हसळाचे चेअरमन श्री.समीर बनकर यांनी रविवार दि.23 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा म्हसळा यांच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज अभिवादन जिल्हास्तरीय स्पर्धा उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले. तसेच अंधश्रद्धा नष्ट होणे काळाची गरज आहे सांगून समाजात अंधश्रद्धा विषयी असलेले गैरसमज दूर झाले पाहिजेत असे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित परीक्षा घेऊन महाराजांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यत पोहचविण्याचे काम अंनिस म्हसळा शाखेने केल्याबद्दल शाखेचे कौतुक केले त्याचबरोबर नागरिकांनी बुवाबाजी, भगतगिरी, हुंडाबळी याला बळी पडू नये असे आवाहनही समीर बनकर यांनी केले. 
यावेळी स्कुल कमिटीचे चेअरमन श्री.समिरजी बनकर साहेब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला व शिक्षणमहर्षी प.पू.डॉ.बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या उपस्थितीत परीक्षा स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.
सदर स्पर्धेत तालुका व तालुक्याच्या बाहेरील एकूण 516 परीक्षा स्पर्धकांनी भाग घेतला होता.
या स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित 100 प्रश्न, 100 मार्क, 100 मिनिटे वेळ, वस्तूनिष्ठ आणि बहू पर्यायी प्रश्न होते. सदर स्पर्धेसाठी इयत्ता 5 वी ते 8 वी गट, 9 वी ते 12 वी आणि खुला असे तीन गट तयार करण्यात आले होते.
म्हसळा शाखेचे कमिटी सदस्य व सर्व पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेऊन ही स्पर्धा सुरळीत पार पाडली. तालुक्यातील काही शिक्षकांनी स्पर्धेसाठी सुपरवायझर म्हणून उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले. परीक्षेसाठी सर्व उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, शिक्षक, पालक, व विद्यार्थी यांचे म्हसळा शाखेचे कार्याध्यक्ष श्री.के.एस भोसले व शाखा अध्यक्ष श्री. गजानन साळुंखे यांनी स्वागत करून आभार मानले.

फोटो म्हसळा येथील छत्रपती शिवाजी महाराज अभिवादन  स्पर्धेचे उदघाटन करताना मान्यवर व परीक्षेसाठी उपस्थित असलेले परीक्षार्थी

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा