संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे आज मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी म्हसळा येथे तहसील कार्यालयासमोर जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांच्या नेतृत्वा खाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष कृष्णा कोबनाक व तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर यांच्या नेतृत्वाखाली निवासी नायब तहसीलदार के.टी. भिंगारे याना शासनाविरूध्द निवेदन देण्यात आले.
आंदोलकांसमोर संबोधीताना कृष्णा कोबनाक यानी शिवसेनेवर टिका करताना, भाजपाचा विश्वासघात करुन काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. सरकार स्थापन करीत असतांना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना 25 हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी 50 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. पण महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुखांना आपल्या आश्वासनाचा विसर पडल्याची आठवण करून दिली,सरसकट कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू अशा घोषणा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळलेले नाही. महाआघाडी सरकारची कर्जमाफी योजनाही शेतकऱ्याची सरसकट फसवणूक करणारी आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फक्त अल्प मुदतीची पीक कर्जे माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱयांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. दोन लाखांवर कर्ज असलेल्या तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱया शेतकऱयांबाबत महाविकास आघाडीच्या कर्जमाफी योजनेत कसलाच उल्लेख नाही.भाजपा सरकारच्या कर्जमाफीत पीक कर्ज तसेच मध्यम मुदतीचे कर्ज समाविष्ट केल्याने पॉलिहाऊस, शेडनेट, शेती उपकरणं, पशुपालन, शेळीपालन, मधमाशीपालन अशा सर्व प्रकारच्या शेतकऱयांना लाभ मिळाला होता. भाजपा सरकारच्या व्यापक कर्जमाफीमुळे 43 लाख खातेधारकांना 19 हजार कोटींचा लाभ देण्यात आला होता. आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करीत आहे, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महिलांवर अत्याचार करणाऱया गुन्हेगारांना धाक बसविण्याऐवजी महाआघाडी सरकारचे मंत्री गावोगावी सत्कार घेण्यात मश्गुल आहेत. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला आहे. अॅसिडहल्ला, अल्पवयीन मुलींवर अत्याचार, बलात्कार, महिलांना जाळून टाकणे अशा घटना वाढू लागल्यामुळे महिला व तरुणीमुलींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा भाजपा तीव्र निषेध करीत आहे.
धरणे अंदोलनात प्रकाश रायकर तालुका अध्यक्ष, माजी तालुका अध्यक्ष शैलेश पटेल, युवामोर्चा जिल्हा चिटणीस महेश पाटील, रायगड जिल्हा चिटणीस सरोज म्हशीलकर, सरचिटणीस तुकाराम पाटील, उपाध्यक्ष भालचंद्र करडे, अल्पसंख्यांक अध्यक्ष समीर धनसे, उपाध्यक्ष गणेश बोर्ले, प्रकाश कोठावळे, अनिल टिंगरे, सुनील शिंदे, सुनील विचारे, दुर्जनसिंग राजपूत, मनोहर जाधव, श्रीकांत जंगम, सुबोध पाटील, धर्मा पाटील, शरद कांबळे, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संखेने सहभागी झाले होते.
Post a Comment