ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) :
महाराष्ट्रातील सर्वच बोलीभाषा जतन झाल्या पाहिजेत हा एकमेव संदेश घेऊन "आगरवाट कविता मराठी मनाच्या आगरी संस्कृतीच्या" ह्या आगरी बोलीभाषा जपणाऱ्या कार्यक्रमाचा दुसरा वर्धापनदिन कोणताही गाजावाजा न करता अनाथ मुलांच्या जीवन संवर्धन आश्रमात पार पडला.
दरम्यान आगरवाटच्या वर्धापनदिना बरोबरच हा ३३ वा प्रयोग होता. आगरवाटची सुरुवात महाराष्ट्राचे प्रसिध्द कविवर्य अरुण म्हात्रे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून खिडकाळी येथील वृद्धाश्रमातून २६ जानेवारी २०१८ रोजी कवी संदेश भोईर , कवी रामनाथ म्हात्रे , कवी श्याम माळी यांच्या संकल्पनेतून झाली आणि पाहता पाहता ह्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त टिटवाळा येथे सदाशिव चव्हाण तात्या यांच्या जीवन संवर्धन अनाथ आश्रमात हा कार्यक्रम पार पडला. तेथे असलेली मुले ही फुटपाथ, रेल्वेस्टेशन येथे एकाकी आयुष्य जगणारी निराधार मुलं आहेत. अशा मुलांना भीक मागणे, ड्रग्स विकणे, पाकीट मारणे या चुकीच्या धंद्याला काही समाजकंटक वापरत असतात आणि दिवसभराच्या कामाचे त्यांना 40/50 रुपये देतात. मग ती मुलं त्यातून एखादा वडापाव आणि अगदी सहज उपलब्ध होत असलेली कोरेक्स, व्हाईटइंक, आयोडेक्स ब्रेडला लाऊन खाणे यासारख्या नशेच्या आहारी जातात. अशा परिस्थितीतून बाहेर पडलेली बरीच मुलं इथं आहेत, असं तेथील संचालक चव्हाण काका यांनी सांगितले. पण आज त्या मुलांची अभ्यासू वृत्ती, शिस्त, जिद्द आणि कलागुणांकडे पाहिलं तर या मागे जीवन संवर्धनचे कार्य किती महान आहे हे अधोरेखित होते.
दरम्यान यावेळी झालेल्या कवी संमेलनात रामनाथ म्हात्रे, श्याम माळी, जयंत पाटील, विनोद पाटील भरोडीकर, पद्माकर म्हात्रे, संतोष पाटील आणि संदेश भोईर यांनी आपल्या आई, आजी, देश, शाळा, संस्कार, समाज या आशयाच्या आगरी, मराठी कविता ऐकवून बालमनावर संस्कार करण्याचा प्रयत्न केला. या वेळी आश्रमातील एका मुलाने अगदी हनीसिंगला सुध्दा मागे टाकेल असं स्वलिखीत रॅप गाऊन दाखवला. प्रेम कदम नावाच्या सातवीत शिकणाऱ्या मुलाने आईवरील त्याने लिहलेली कविता गाऊन दाखवली. यावेळी सर्व उपस्थित लोकांचे डोळे पाणावले. सदर कार्यक्रम संगीतमय वातावरणात व उत्साहात पार पडला .
दरम्यान चव्हाण तात्यांनी आमच्या आश्रमात अनेक कार्यक्रम झाले पण असा बहारदार कार्यक्रम गेल्या १० वर्षात झाला नाही त्याबद्दल त्यांनी सर्व आगरवाटच्या कवींचे आभार मानून सन्मान केला. या वेळी एक सामजिक भान म्हणून आगरवाटच्या कवी मंडळींकडून पाच हजार रुपयांचा धनादेश आश्रमासाठी संचालकांना सपूर्द केला आणि पुढील सत्कर्मासाठी शुभेच्छा दिल्या.
Post a Comment