अंबरनाथ (गुरुदत्त वाकदेकर)
ठाणे जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका चारुशीला किरण भामरे यांच्या 'वारी क्रांतीची' व 'अक्षरधाम' या प्रथम काव्यसंग्रहांचा दिमाखदार प्रकाशन सोहळा अंबरनाथ येथील स्वानंद शाँपिंग सेंटर येथील सभागृहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमात अंबरनाथ तालुका पंचायत समिती सभापती मा. स्वप्नाली भोईर, सुप्रसिद्ध साहीत्यिका पल्लवी परूळेकर -बनसोडे, महाराष्ट्र साहित्य परिषद अंबरनाथचे अध्यक्ष अरुण मैड, कार्याध्यक्षा रेखा मैड, ज्येष्ठ गझलकार किरण जोगळेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती देवी व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. संगीत विशारद श्री. घोडके यांनी सरस्वती स्तवन, ईशस्तवन सादर केले. ढोलकी वादक जाधव व घोडके यांच्या साथीने व हर्षल साबळे अनिता पाटील, दर्शना तोत्रे, सीमा ईगवे आणि चारूशीला भामरे यांनी सुंदर स्वागतगीत सादर केले.
मान्यवरांच्या स्वागतानंतर प्रास्ताविक अरूण मैड व मैड यांनी केले. अक्षरधाम वर बोलताना अरुण मैड यांनी मुळाक्षरांचा इतिहास अतिशय रंजक पद्धतीने मांडला.
आई आणि सासूबाई यांच्या आशिर्वादाच्या हृद्य सोहळ्यानंतर पुस्तकांचे प्रकाशन 'ज्ञान कुंभ व साहीत्य कुंभ' या अनोख्या पद्धतीने अध्यक्ष पल्लवी परुळेकर -बनसोडे, सभापती स्वप्नाली भोईर मँडम यांच्या हस्ते व सर्व मान्यरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
प्रकाशन सोहळ्यास राज्य, जिल्हा व तालुका पुरस्कार प्राप्त शिक्षक, मान्यवर कवी / लेखक, समूह प्रशासक, कुटूंबीय, मित्रपरिवार, व विविध संस्था, संघटना यांचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
वारी क्रांतीची व अक्षरधाम ही दोन्ही शैक्षणिक पुस्तके शाळा- शाळांमध्ये, पालक आणि बालक यांच्या पर्यंत पोहचली पाहीजेत असे आवाहन मान्यवरांनी आपल्या भाषणात केले. लेखिका चारूशीला भामरे यांना आजपर्यंत अनेक शैक्षणिक, सामाजिक व साहीत्यिक पुरस्कार प्राप्त असून त्यांच्या लेखणीतून अशीच साहित्य निर्मिती व मराठी भाषेची सेवा घडावी अशी शुभेच्छा मान्यवरांनी दिली.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन जयश्री नाडे व सुचिता सोनार यांनी केले. आभार प्रदर्शन हर्षल साबळे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने करण्यात आली.

Post a Comment