● अखिल भारतीय शिक्षक संघ म्हसळा शाखेचा वर्धापनदिन साजरा
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
देशाची भावी सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम करीत असतानाच आपले न्याय, हक्क मिळविण्यासाठी संघटित राहून लढा देणाऱ्या अखिल भारतीय शिक्षक संघ म्हसळा शाखेचा वर्धापन दिन 7 जानेवारी रोजी कन्याशाला म्हसळा येथे शाखेचे अध्यक्ष सुनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपसभापती मधुकर गायकर, माजी उपसभापती संदिप चाचले, प्रा.कानिफनाथ भोसले, पत्रकार श्रीकांत बिरवाडकर, अखिल रायगड प्राथ.शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष किशोर मोहिते, उपाध्यक्ष गीतांजली भाटकर, हिशोब तपासणीस कैलास कळस, तालुका शाखेच्या सल्लागार शुभदा दातार, दिनेश पाटील, विद्यानंद वानखडे, कार्याध्यक्ष रमेश जाधव, सरचिटणीस प्रकाश मांडवकर, कोषाध्यक्ष सुमित्रा खेडेकर, उपाध्यक्ष विजय घाटगे, सहसचिव समीर पाष्टे, संघटक प्रदिप खामगावकर, विजय निमजे, दिलीप शिंदे, महीला प्रतिनिधी संगिता आंबेडकर, पनिता गावीत, वंदना खोत, व इतर शिक्षक बंधूभगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे निमित्ताने 1)म्हसळा शहर व चिखलप येथे असणारे महिला शिक्षिकानिवासस्थान पूर्णपणे नादुरुस्त आहेत तरी ती नवीन बांधून मिळावी. 2) तालुक्यातील शिक्षकांसाठी शिक्षकभवन बांधून मिळणे याबाबत संघटनेच्या वतीने लेखी निवेदन पंचायत समिती पदाधिकारी यांना देण्यात आले. तसेच शालेय पोषण आहार वेळेवर मिळणे, इंधनखर्च व मानधन वेळेवर मिळणे, शिक्षणविभागात शिपाई मिळणे, शिक्षण विभाग कार्यालयात शिक्षकांना सन्मानाची वागणूक मिळणे, सेवानिवृत्त शिक्षकांची कामे वेळेवर होणे सेवानिवृत्त प्रस्ताव परीपूर्ण करून जिल्ह्यात पाठवणे इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपसभापती मधुकर गायकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की संघटनेने शिक्षक भवन व शिक्षिका निवासस्थान याबाबत दिलेले निवेदन आपल्या राज्यमंत्री नामदार आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू तसेच संबंधित शिक्षिका निवासस्थानाचे जागेवर झालले अतिक्रमण हटविणेसाठी पंचायत समितीच्या सभेत चर्चा करण्यात येईल असे सांगून देशाची भावी सुसंस्कृत पिढी घडविणाऱ्या शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे उपसभापती मधुकर गायकर यांनी सांगितले.
पंचायत समिती सदस्य तथा उपसभापती संदिप चाचले यांनी शिक्षक वर्धापन दिनाच्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. तसेच प्रलंबीत प्रश्न सोडवण्यासाठी पंचायत समिती पदाधिकारी व अधिकारी यांच्या समवेत संघटना पदाधिकारी यांची सभा लवकरच आयोजित केली जाईल असे अभिवचन दिले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक श्री.कानिफनाथ भोसले यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना आजच्या विज्ञान युगात शिक्षण क्षेत्रातील होत असलेले अमुलाग्र बदल प्राथमिक शिक्षकांनी आत्मसात करून घेणे गरजेचे आहे असे सांगून बदलत्या शिक्षण क्षेत्राविषयी अनेक मार्मिक उदाहरणे व दाखले देऊन प्राथमिक शिक्षक मूल्यशिक्षणाचे धडे देण्याचे काम करतात त्याचबरोबर वैज्ञानिक व विवेकी शिक्षणवर भर दिला पाहिजे असे सांगून जनतेला धार्मिक शिक्षणाबरोबरच मूल्यशिक्षण व वैज्ञानिक शिक्षणाची गरज असल्याचे मत प्रा.कानिफनाथ भोसले यांनी व्यक्त केले.
तसेच अध्यक्ष सुनिल पवार आणि जिल्हा कार्याध्यक्ष किशोर मोहिते यांनी मनोगत व्यक्त करताना अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या शिक्षकांना काम करीत असताना येणाऱ्या अडचणी उपस्थित मान्यवरांच्या निदर्शनास आणून दिले.
कार्यक्रमामध्ये गुणवंत शिक्षक पवन अडवळे राजिप शाळा कणघर, संदीप जाधव राजिप शाळा साळविंडे, तसेच विद्यानंद वानखडे राजिप शाळा मेंदडीकोंड यांचा सत्कार करण्यात आला.
Post a Comment