श्रीवर्धन : कोंडविली राजिप शाळा झाली डिजिटल ; स्वदेस फाऊंडेशन आणि शिक्षकांचे मोलाचे योगदान


श्रीवर्धन : कोंडविली राजिप शाळा झाली डिजिटल 
स्वदेस फाऊंडेशन आणि शिक्षकांचे मोलाचे योगदान 

प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
सध्याच्या आधुनिक युगामध्ये शिक्षण हा जीवनाचा पाया आहे व प्राथमिक शाळेपासून दर्जेदार व तंत्रज्ञान युक्त शिक्षण ही काळाची गरज आहे . त्यामुळे आता खाजगी शाळांच्या तोडीने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा डिजिटलाईज होत आहेत , ही कौतुकाची बाब असल्याचे प्रतिपादन श्रीवर्धन तहसीलदार सचिन गोसावी यांनी केले . तालुक्यातील कोंडविली प्राथमिक शाळेच्या डिजिटल प्रणालीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते . या आधुनिक युगामध्ये संगणक व मोबाईलकडे विद्यार्थ्यांचा ओढा असतो . त्यामुळे विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळांमधूनच संगणक व तत्सम प्रणालीद्वारे शिक्षण मिळावे या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सध्या कात टाकत आहेत . त्या डिजिटल करण्याकडे शिक्षण विभागाचे प्रयत्न आहेत . श्रीवर्धन तालुक्यातील कोंडविली जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची प्राथमिक शाळाही स्वदेस फाऊंडेशन व विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश तोडणकर व उपशिक्षक सुशांत येसवारे यांच्या योगदानातून शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाने शाळा डिजिटल करण्यात आली आहे . यामध्ये विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रम संगणकाच्या मोठ्या पडद्यावर दाखवून त्याद्वारे अभ्यासक्रम आकर्षक पद्धतीने शिकवण्यात येणार आहे . या शाळेच्या डिजिटल प्रणालीचे उद्घाटन श्रीवर्धन पंचायत समितीच्या सभापती मीना गाणेकर यांच्या हस्ते करण्यात आले , याप्रसंगी तहसीलदार सचिन गोसावी , उपसभापती बाबुराव चोरगे , पंचायत समिती सदस्य मंगेश कोमनाक , जिल्हा परिषद सदस्या प्रगती आदवडे , गटशिक्षण अधिकारी नूरमहम्मद राऊत , केंद्रप्रमुख शीतल तोडणकर , धर्मा धामणकर , भास्कर पांगारकर तसेच बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते . सभापती मीना गाणेकर यांनी प्रशालेचे कौतुक करीत पंचायत समितीच्या माध्यमातून पुढे पूर्ण सहकार्य मिळण्याचे आश्वस्त केले . तर तहसीलदार सचिन गोसावी यांनी आपल्या मनोगतात , मीदेखील प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून पूर्ण केले असून विद्याथ्यांनी उत्तम सुविधेचा आपल्या शिक्षणासाठी सर्वतोपरी फायदा करून घ्यावा व आपले जीवन शिक्षणाने समृद्ध करावे , अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेतील मुलांनी पारंपारीक लोकगीतावर नृत्य सादर केले .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा