दिवेआगर समुद्र किनारा पर्यटकांनी बहरला

बोर्ली प्रतिनिधी

दिवेआगर समुद्रकिनारी जावून कोकणातील सौंदर्य डोळयामध्ये साठवून घ्यायचे, समुद्राच्या फेसाळत्या लाटांमध्ये डुंबून मौजमजा करायची व माश्यावर ताव मारायचा यासाठी नेहमीच पुणे, मुंबई, औरंगबाद, अहमदनगर सोलापूर, कोल्हापूर तसेच जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक दिवेआगर, श्रीवर्धन व हरिहरेश्वर बीचला नेहमीच पसंती देत असतात दिवाळीच्या सुट्टीच्या शेवटच्या शनिवार -रविवार दिवेआगर समुद्र किनारा पर्यटकांनी बहरला होता. 

पावसाळा संपल्या नंतर दिवाळी हा पर्यटनाच्या दृष्टीने नवीन हंगामाची सुरुवात होत असते परंतू श्रीवर्धन तालुक्यातील सुवर्ण गणेशाच्या दिवेआगर, श्रीमंत बाळाजी पेशव्यांचे श्रीवर्धन व भारतामध्ये दक्षिण काशी म्हणून सुप्रसिद्ध हरिहरेेश्वर तीर्थक्षेत्र या पर्यटन स्थळ समुद्र किनारी सध्या पावसाळी वातावरण व समुद्रातील वादळ यामुळे पर्यटकांविना समुद्र किनारे ओस पडल्याचे चित्र मागील पंधरा दिवसांमध्ये होते. परंतू दोन दिवसापासून चांगले वातवरण तयार होत असल्याने पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक आपल्या बच्चे कंपनीसह कुटंबासमवेत तर काही तरुण तरुणी आपल्या मित्र मैत्रिणींसह श्रीवर्धन तालुक्यामध्ये दाखल झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये दिवेआगर समुद्र किनारा चांगलाच बहरला आहे मागील 15 दिवासांमध्ये ग्राहक नसल्याने नाराज झालेले हॉटेल व्यवसायिक घरगुती खानावळ यांच्या चेहऱ्यावर हास्य पहावयास मिळत आहे. दिवेआगर समुद्र किनारा रायगड जिल्ह्यातील सुरक्षित समुद्र किना-यापैकी एक आहे या ठिकाणी प्रकट झालेल्या सुवर्ण गणेशामुळे श्रीवर्धनच नव्हे तर रायगड जिल्हा पर्यटन दृष्टया जगाच्या नकाशावर चमकू लागला आहे. नव्याने बांधण्यात आलेले दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिर, पुरातन मुर्ती असलेले रुपनारायण, सुंदर नारायण, उत्तरेष्वर मंदिर पहाण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी आवर्जुन पर्यटक महाराष्ट्र भरातून येत असतात. तसेच दिवेआगर समुद्र किनारी विसावून नियमित कामाच्या ताणापासून मुक्ती मिळविण्यासाठी व मौजमजा करण्यासाठी तर पर्यटकांची नेहमीच पसंती दिवेआगर किनाऱ्याला असते यासोबतच भारतातील सुप्रसिद्ध दक्षिण काशी हरिहरेश्वरराचे दर्शन घेण्यासाठी व श्रीवर्धन या श्रीमंत बाळाजी  पेशवे यांच्या जन्मभूमी मध्ये जावून तेथील निसर्ग सांदर्याची मजा लुटण्यासाठी येत असतात. सध्या पर्यटनाचा काळ पुन्हा सुरु झाला असून दिवेआगर समुद्र किनारा पर्यटकांनी बहरून गेला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा