क्यार चे दुरगामी परिणाम : शेतकऱ्यां पाठोपाठ मच्छीमार संकटात ; समुद्री वादळाने मासेमारी व्यवसाय धोक्यात मच्छीमारां विषयी सरकार उदासीन
श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
कोकणातील मुख्य व्यवसाय असलेल्या मच्छीमारीला क्यार वादळाचा मोठा फटका बसला आहे .शेतकरी वर्गा विषयी सरकारने संवेदनशीलता दर्शवत तात्काळ नुकसानभरपाई देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामास लावली आहे .मात्र कोकणातील हजारो मच्छिमार व्यवसायिकां कडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे .रायगड जिल्ह्यात कोळी समाज व्यतिरिक्त मुस्लिम , भंडारी ,मराठा या समाजातील घटक मासेमारी शी निगडित व्यवसाय करतात .वाहतुक , बोट बांधणी , मासेमारीसाठी आवश्यक बाबी यांचा व्यापार नारळीपौर्णिमे नंतर जोरात असतो .नोव्हेंबर डिसेंबर हा मासेमारी साठी सुगीचा कालावधी मानला जातो .सुरमई , पापलेट व बोंबील या जातीची मच्छी सुगीच्या दिवसात आढळते .तसेच या मच्छीला बाजारात फार मागणी आहे कारण यांचा खवय्या वर्ग मोठा आहे .
क्यार चे दूरगामी परिणाम मासेमारी वर झाले आहेत .समुद्रातील वादळाचा धोका पत्करत मासेमारी करणे अवघड झाले आहे. हवामानात अचानक बदल होत आहेत सकाळी धुक्याचे प्रमाण वाढले आहे .आकाशात कधी लख्ख सूर्यप्रकाश असतो तर कधी मळभ दाटून येते .मेघ गर्जना तर कधी विजांचा खेळ सुरू होतो .जोरदार वारे ही मच्छिमारी करणाऱ्या लोकांच्या दृष्टीने सगळ्यात आव्हानात्मक बाब ठरत आहे .समुद्राच्या भरती ओहटी विषयी मच्छिमार सजग असतो परंतु हवामान बदलामुळे समुद्रात निर्माण होणाऱ्या वादळी वाऱ्याने बैचेन झाला आहे . समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्या मुळे निर्माण झालेल्या वादळाने मासेमारी साठी लोकांना समुद्रात दूरवर जावे लागत आहे .अगोदर 5 ते 8 वाव पर्यंत मासेमारी करतांना सहज मासे मिळत होते परंतु आज 10 वाव च्या पुढे जाऊन मच्छीमारी करावी लागत आहे .त्यामुळे निश्चितच मच्छीमारांच्या समस्या वाढल्या आहेत .श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात दिघी , श्रीवर्धन , शेखार्डी ,जीवना ,आदगाव , सर्वा , हरवीत , रोहिणी , तुरुबाडी , वाशी या ठिकाणी मासेमारी केली जाते .आज दोन्ही तालुक्यातील अनेक बोटी किनाऱ्यावर नांगरण्यात आल्या आहेत .जीवितास धोका व उत्पन्नाची हमी नसणे या दोन्ही बाबी मासेमारी करणाऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरत आहेत .
कोकणातील सर्वात मोठा मानला गेलेला कोळी समाज हा आज ही मुखत्वे मासेमारी वर अवलंबून आहे .उत्पन्नाचे दुसरे साधन नाही सर्व उपजीविका ही मासेमारी वर चालते .अनेक वर्षाचा पुर्वापार चालत आलेला व्यवयाय म्हणून कोळी समाज मासेमारी कडे बघतो .समाजातील शिक्षणाचे प्रमाण अतिशय नगण्य आहे .त्यामुळे मासेमारी या व्यवसायाला प्राधान्य दिले जाते .गेल्या वर्षी पासून हवामानातील बदल मासेमारी व्यवसायासाठी धोकादायक ठरू लागला आहे .तितली , क्यार व आता महा वादळ मासेमारी करणाऱ्या लोकांना देशोधडीला लावत आहे .तर दुसरी कडे कोकणात येणारे रासायनिक प्रकल्प मासेमारी संपुष्टात आणण्यासाठी टपलेले आहेत .मात्र सरकार त्या विषयी असंवेदनशील बनले आहे .कोळी समाजची श्रीवर्धन म्हसळा तालुक्यातील लोकसंख्या अंदाजे 22 हजाराच्या जवळपास आहे .विदर्भ ,मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे राजकीय नेते बांधावर पोहचून सरकार दरबारी आक्रोश करत आहेत मात्र कोकणातील राजकीय धुरीण ना आपल्या हक्काच्या मतदारां विषयी घेणे देणे नसल्याचे चित्र आहे .शेतकऱ्यां सोबत मासेमारी करणाऱ्या लोकांना सरकार कडून मदत मिळावी ही अपेक्षा कोळी बांधव व्यक्त करत आहेत .
समुद्रातील वादळाने मासेमारी अवघड झाली आहे .मासे लवकर मिळत नाहीत .अगोदर 1 ते 2 तासात मासे मिळत होते .आता 5 ते 06 तास दूर गेल्यावर मासे मिळतात मात्र त्याचे प्रमाण अतिशय कमी आहे .सर्व लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
-हरिदास वाघे (व्यवसायिक मच्छिमार श्रीवर्धन )
श्रीवर्धन तालुक्यातील अनेक कुटुंब मासेमारी वर अवलंबून आहेत .निसर्गाचा कोप मासेमारी साठी घातक ठरत आहे .त्याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे .लहान बोटी पाण्यात चालवणे अवघड झाले आहे .वातावरण केव्हा बदलेल ते सांगणे कठीण आहे .सरकार ने मासेमारीवर अवलंबून असणाऱ्या लोकांना मदत करावी ही अपेक्षा आहे .
जुनेद दुस्ते (व्यावसायिक मच्छिमार श्रीवर्धन शहर )
आम्ही हजारो रुपये गुंतवणूक करून मासेमारी व्यवसायला प्रत्येक वर्षी सुरुवात करतो .गेल्या वर्षी पासून समुद्रातील विविध वादळानी धंद्याची पुरती वाट लावली आहे .धंद्यात गुंतवलेले पैसे परत मिळण्याची शक्यता कमी आहे .
मोहन वाघे (मच्छिमार जीवना ..श्रीवर्धन )
मासेमारी व्यवसायला वादळाचा फटका बसला आहे .मासे मिळत नाहीत .खलाशी व इतरांचे पगार देणे अवघड झाले आहे .त्यात डिझेल चे दर वाढलेले आहेत .सरकारने मासेमारी चा दुष्काळ जाहीर करून आम्हाला शेतकऱ्यां प्रमाणे मदत करावी.
-चंद्रकांत वाघे ( व्यावसायिक जीवना बंदर श्रीवर्धन )
Post a Comment