राजिप केलटे शाळेत स्वच्छता जनजागृतीचा उपक्रम


म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

   महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील रा.जि.प.शाळा केलटे येथील विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी ग्रामस्वच्छता व प्लास्टिक मुक्त गाव करण्यासाठी प्लास्टिक गोळा करून स्वच्छते बाबत संदेश देणाऱ्या घोषणा देऊन जनजागृती निर्माण करण्याचा एक सामाजिक उपक्रम राबविला. 
यावेळी केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक सुनिल पवार यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता बाबत माहिती सांगितली तसेच आपल्या आजूबाजूला परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्याचे आव्हान करून सरकारने प्लास्टिक बंदीबाबत घेतलेल्या निर्णय स्वागतार्ह असून सर्वांनी त्याचे पालन केले पाहिजे असे सांगितले. यावेळी विद्यार्थी व पालकांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी सामाजिक बांधिलकी जपून आणि पर्यावरणाची काळजी म्हणून ग्रामस्वच्छता केली पाहिजे तसेच प्लास्टिक मुक्त गाव करण्यासाठी प्लास्टिक न वापरता पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर केला पाहिजे असे सांगितले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सुनिल पवार, शिक्षक दत्ता जाधव, शिक्षिका श्रीमती पाटील, श्री.गायकवाड सर, श्रीमती दर्गे मॅडम यांनी मेहनत घेतली.
    यावेळी या उपक्रमाचे निमित्ताने शाळेत पंचायत समितीचे गटविकासअधिकारी वाय.एम.प्रभे, गटशिक्षणाधिकारी संतोष शेडगे, वन परिमंडळ अधिकारी बाळकृष्ण गोरणाक, वनसंरक्षक भीमराव सुर्यतल, वनरक्षक अतुल अहिरे, यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थी, शिक्षक व पालकवर्गाचे कौतुक केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा