गौरी गणपतीची भेट होताच पावसाने केली उघडीप : गौरी -गणपती भक्तांच्यात उत्साह.

गौरी गणपतीची भेट होताच पावसाने केली उघडीप : गौरी -गणपती भक्तांच्यात उत्साह.
पाऊस थांबल्याने महीलानी उत्साहांत केला सण साजरा
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
गणपतीच्या आईचे म्हणजेच गौरींचे माहेर वाशीणीसारखे आज स्वागत केले .ज्येष्ठगौरी अनुराधा नक्षत्रात येतात. ज्येष्ठा नक्षत्रात त्यांचे पूजन केले जाते. मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातील सगळे जण एकत्र येतात. त्यावेळी आपल्या घरी माहेरवाशीण म्हणून ३ दिवस राहणाऱ्या या गौरींसाठी छानशी सजावटही केली जाते. यामध्ये फुलांनी, घरातील स्त्रियांनी केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंनी किंवा बाजारात तयार मिळणारे सजावटीचे सामान वापरुन सजावट केली जाते. गौरीच्या मुखवट्यांमध्येही शाडूच्या, पितळ्याच्या, कापडाच्या, फायबरच्या असे बरेच प्रकार पाहायला मिळतात. काहींकडे केवळ मुखवट्यांची पूजा होते तर काहींकडे पूर्ण उभ्या गौरी असतात. कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी असते. ब्राह्मण समाजात समुद्रातील किंवा नदीतील खडा आणून त्या पूजण्याची रित आहे . तर काही जणांकडे तांब्यावर चेहरा रेखाटून गौरींचे पूजन केले जाते. पहिल्या दिवशी गौरीला भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो.त्यांना नवीन वस्त्र, दागदागिने घालून सजऊन सूप ओवसल्यावर सकाळच्या सत्रात पावसाने उघडीप घेतली त्यामुळे माहेरवासणींत प्रचंड उत्साह होता .ओवसणे ही प्रथा आहे. ही प्रथा दरवर्षी होत नसून ज्या वर्षी पूर्वा नक्षत्रावर गौरीचे पूजन होते त्याच वर्षी ही सुपे ओवसली जातात. नारळ, पोफळ, भात, मीठ, भाजीपाला पिकविणारा कोकणचा भाग म्हणजे आगर. आगरी समाजामध्ये लग्न झाले की नववधू कडील मंडळी या ओवशाची वाट पाहतात. नव्या सुपात चोळखण वगैरे पूजा द्रव्ये, पाच प्रकारची फळे, पाच प्रकारचे घरात केले जाणारे सणाचे पदार्थ-मोदक, करंजा, लाडू वगैरे घेऊन नवी साडी चोळी लेवून नववधू ते सूप डोक्यावर घेऊन गौरीचे पूजन झाले की गौरीजवळ जाऊन ते भरले सूप गौरीसमोर धरून वरून खाली अशाप्रकारे पाच वेळा करते याला सूप ओवसणे (ओवाळणे) म्हणतात. अशी ओवसलेली कमीत कमी पाच सुपे डोक्यावर घेऊन (पूर्वी अनवाणी) चालत, बरोबर कमीत कमी पाच सवाष्ण घेऊन ती सासरी जाते. सासरी यास सुपांचा ओवसा आला म्हणतात. हा आला ओवसा सासरी स्वीकारला जातो. मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जाणारा हा उत्सव ही मराठी व आगरी समाजाचे संस्कृतीची एकप्रकारे ओळखच आहे, या मध्ये महीला वर्ग मोठया प्रमाणात हा सण साजरा करतात. तालुक्यातील खारगांव ( बु ), तोंडसुरे, खारगाव (खु), आगरवाडा, बनोटी, गणेशनगर,खरसई, मेंदडी, मेंदडी कोंड, वारळ, काळसुरी,गोंडघर या आगरी वसतीच्या गावांतून यावेळी महीतांच्यांत नेहमीपेक्षा जास्त उत्साह होता.

फोटो : विविध फोटोंतून आगरी भागातील महीला सण साजरा करताना

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा