श्रीवर्धन मधील पेशवे आळीतील रहिवाशांची भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ता साठी मुख्याधिकाऱ्या कडे धाव


श्रीवर्धन मधील पेशवे आळीतील रहिवाशांची भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ता साठी मुख्याधिकाऱ्या कडे धाव 
रहिवाशी , पर्यटक  व पादचाऱ्यांना त्रास 

श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते 

श्रीवर्धन शहरातील  पेशवे आळीतील रहिवाशांना भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला आहे .त्यामुळे रहिवाशांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणकुमार मोरे यांच्या कडे धाव घेतली आहे .  श्रीवर्धन मधील पेशवे स्मारक बघण्यासाठी निरंतर पर्यटकांचा ओघ पेशवे आळीत असतो .मात्र स्मारक परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्याचा त्रास पर्यटक , पादचारी व रहिवाशी सर्वांना होत आहे .पेशवे आळीतील महेश वैद्य यांनी नगरपालिके कडे  58 लोकांच्या सहीचे निवेदन दिले आहे .शाळेत जाणारे विद्यार्थी , सकाळी मॉर्निंग वॉक साठी आलेली मंडळी यांना पेशवे आळीत कुत्र्यांच्या झुंडी मुळे सकाळी सकाळी धावपळ करावी लागते .विद्यार्थ्यांच्या अंगावर धावून जाणे , सायकलस्वार व दुचाकी स्वार यांचा पाठलाग करणे  या बाबी मुळे पेशवे आळीतून विद्यार्थी व दुचाकी स्वार यांचे जाणे येणे अवघड झाले आहे .रात्री अपरात्री  या भटक्या कुत्र्यांच्या आवाजाचा त्रास स्थानिक लोकांना होत आहे .पेशवे स्मारक ही ऐतिहासिक वास्तू आहे .तिचे  संवर्धन अगत्याचे आहे .मोकाट कुत्रे स्मारकाच्या प्रांगणात सर्वत्र घाण करत आहेत .पेशवे आळीत व लगत  जोशी , तोडणकर , नाळे व चित्रा असे  चार हॉस्पिटल आहेत .त्यामुळे येणाऱ्या रुग्णांना भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे .पेशवे आळीचा रस्ता हा श्रीवर्धन शहरातील रहदारी चा मुख्य रस्ता आहे .श्रीवर्धन   मधील प्रभू आळी , भैरवनाथ पाखाडी , दाबक पाखाडी ,नारायण पाखाडी , चौकर पाखाडी  हे सर्व मार्ग पेशवे आळी शी जोडलेले आहेत . पेशवे आळीतील एक रस्ता प्रसिद्ध लक्ष्मीनारायण मंदिरा कडे जातो .श्रीवर्धन मधील स्टेट बँक ऑफ इंडिया ची शाखा पेशवे आळीच्या लगत च आहे .त्या कारणे बँकेच्या ग्राहकांना पेशवे आळीतून जाणे सोपे पडते .पेशवे आळीत सदैव लोकांची वर्दळ असते . आजमितीस भटक्या कुत्र्यांची  दहशत   निर्माण झाली आहे त्यामुळे त्यांच्या बंदोबस्ता साठी सर्वांनी एकत्र येऊन नगरपालिके कडे धाव घेतली आहे .
सप्टेंबर ते ऑक्टोबर हा कुत्र्यांच्या प्रजननाचा काळ मानला जातो त्यामुळे नगरपालिके कडून  त्यांच्या संख्ये विषयी योग्य उपाय योजना करण्याची मागणी करण्यात येत आहे .

पेशवे आळीत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे.20 ते 25 कुत्रे रात्री निदर्शनांस येतात .त्यांच्या आवाजाने रात्री झोप लागणे अवघड झाले आहे .शालेय विद्यार्थ्यांना  कुत्र्यांपासून धोका निर्माण झाला आहे .आम्ही नगरपालिके कडे कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी केली आहे ...महेश वैद्य (रहिवासी पेशवे आळी )

भटकी कुत्रे पेशवे स्मारक परिसर अस्वच्छ करत आहेत .आळीतून जाणे येणे करणाऱ्या सर्व लोकांना त्यांचा मोठा त्रास होत आहे .पहाटे लवकर उठून चालण्यासाठी  बाहेर पडणे  अवघड झाले आहे .कुत्रे चावा घेण्याची भीती निर्माण झाली आहे ... उदय आवळस्कर (रहिवाशी पेशवे आळी )

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा