मोठा अनर्थ टळला : त्या पंचवीस जणांचा काळ आला होता..पण.....



भारत गोरेगावकर 
6 ऑगस्ट 2019 ची भयान रात्र रायगड जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाच्या कोसळधारा सुरू होत्या महाड माणगाव गोरेगाव विभागाला महापुराचा तडाखा बसलेला स्थानिक ग्रामस्थांसह पोलीस, प्रशासकीय यंत्रणा डोळ्यांत तेल घालून जागता पहारा देत होती काही ठिकाणी तर सैन्यदलाच्या तुकड्या मदत करत होत्या या भयंकर परिस्थिती मधून माणगाव तालुक्यातील गोरेगाव देखील सुटले नव्हते.गोरेगाव म्हसळा रस्त्यावरती गावतलावा जवळ  प्रचंड पाणी आल्याने संध्याकाळ पासूनच हा मार्ग वाहतूकी साठी बंद ठेवला होता.गोरेगावातील जागृत नागरिक सतर्क होते.
  रात्री अडीच वाजताची वेळ मुंबई-श्रीवर्धन ही बस तशी एरवी मोर्बा मार्गे धावणारी आज तो रस्ता बंद असल्याने गोरेगाव मार्गे श्रीवर्धन कडे जाण्यासाठी आली बस मध्ये जवळपास पंचवीस प्रवासी  रात्रभर जागता पहारा देणार्या गोरेगावातील सतर्क नागरिकांनी उर्दू शाळे जवळ बस थांबवली आणि पाण्यातून जाऊ नये असा सल्ला दिला.मात्र स्वतःला पायलट समजणार्या चालकाने सल्ला आणि सुचने कडे दुर्लक्ष करून प्रवाशांसह पाच ते सहा फूट पाण्यात सर्व प्रवाशांसह बस घातली काही अंतर पुढे जात नाही तोच प्रवाहात वाकडी होत बस कलंडत आली आणि सुदैवाने रस्त्यालगतच्या एक नाल्यात अडकली केवळ दैव बलवत्तर....म्हणून ते सल्ला देणारे देवदुत तिथेच जवळपास होते जिवाची पर्वा न करता या जांबाज नागरिकांनी कंबरभर पाण्यातून ती बस गाठली आणि आतमधील सर्व प्रवासी आणि स्टंटमन चालक वाहकाला सुखरूप पणे बाहेर काढले.म्हणून एक मोठा अनर्थ होता होता टळला.आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला सलाम या देवदुतांना नाहीतर आजची पहाट एका मोठ्या दुर्घटनेच्या दुर्दैवी बातमीनेच झाली असती.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा